डुकरांसाठी लावलेल्या सापळ्याचा ‘शॉक’; दोन जणांचा मृत्यू, तिघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 09:56 AM2023-10-06T09:56:49+5:302023-10-06T09:58:10+5:30
कर्मचारी यांच्यावर संशयित म्हणून ठपका ठेवत त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
पालघर : तालुक्यातील नंडोरे (बसवतपाडा) येथील एका चिकूच्या वाडीमध्ये डुकरांपासून संरक्षणासाठी लावलेल्या वीजतारेच्या सापळ्याचा शॉक लागून दोन जणांसह एका बैलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पालघर पोलिसांनी वाडीचे मालक संजय भानुशाली, वीरेंद्र घोडके आणि पालघर महावितरण विभागाचे संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावर संशयित म्हणून ठपका ठेवत त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
पालघरातील आश्रमशाळेत ९ वीमध्ये शिकणाऱ्या १५ वर्षांचा मुलगा सुजित म्हैसकर आणि दिनेश बोस (वय २२) हे दोघेही बुधवारी रात्री खेकडे पकडण्यासाठी बसवतपाडा भागातील एका वाडी परिसरातून जात असताना ही घटना घडली.
दुर्घटनेनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
पालघर पोलिस व महावितरण विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिल्यावर वाडीतील महावितरण विभागाच्या एका पोलवरून चोरट्या पद्धतीने हा विद्युत प्रवाह वाडीतील एका विद्युत बॉक्समध्ये सोडून तो पुढे नेण्यात आल्याचे दिसून आल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
चोरट्या पद्धतीने नेण्यात आलेला विद्युत प्रवाह डुकरांना पकडण्याच्या लोखंडी तारांच्या सापळ्यात आणि तेथून वाहणाऱ्या नाल्याच्या पाण्यात सोडण्यात आल्याचे दिसून आले. मात्र, ही घटना घडल्यानंतर वायरचे तुकडे तुकडे करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचे घटनास्थळी दिसून आले.