Virar Covid hospital Fire: धक्कादायक! भिंत बांधून ‘इमर्जन्सी एक्झिट’ केली बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 11:38 PM2021-04-23T23:38:34+5:302021-04-23T23:38:48+5:30
विरारमधील विजयवल्लभ रुग्णालय दुर्घटना प्रकरण : अखेर रुग्णांना पुढील दरवाजातूनच काढावे लागले बाहेर
प्रतीक ठाकूर
लोकमत न्यूज नेटवर्क
विरार : विरार पश्चिम येथील विजयवल्लभ कोविड रुग्णालयात लागलेल्या आगीत तब्बल १५ जणांना आपले प्राण नाहक गमवावे लागले आहेत. धक्कादायक म्हणजे या हॉस्पिटलच्या एक्झिट पॉइंटवर भलीमोठी भिंत बांधून बाहेर पडण्याचा मार्गच बंद करण्यात आला असल्याचे निदर्शनास आले आहे. या ठिकाणी मोठी रूम उभारून इतर कामासाठी वापरण्यात येत होती. याचा परिणाम म्हणून दुर्घटनेनंतर रुग्णांना पुढील मार्गानेच ॲम्ब्युलन्समध्ये नेण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.
विजयवल्लभ रुग्णालयात ७९ रुग्ण दाखल होते. त्यापैकी १७ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. रात्री साडेतीनच्या सुमारास या हॉस्पिटलच्या सेन्ट्रलाइज एसीमध्ये शॉर्टसर्किटने आग लागली. यात १५ रुग्णांचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे या हॉस्पिटलचा इमर्जन्सी एक्झिट पॉइंट मागील महिन्यातच अनधिकृत रूम उभारून बंद करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या दरवाजाच्या उजव्या बाजूला शेड टाकून अन्य सुविधांकरिता या जागेचा वापर करण्यात येत आहे.
कायद्याने रुग्णालयाला मोठे दोन प्रवेश मार्ग असणे बंधनकारक आहे, पण या ठिकाणी पालिकेच्या डोळ्यासमोरच अनधिकृत बांधकाम करण्यात आले. हा एक्झिट मार्ग बंद केला गेला नसता तर उपचार घेत असलेल्या रुग्णांना या मार्गाने बाहेर काढणे सोपे गेले असते. मात्र, हॉस्पिटल प्रशासनावर रुग्णांना पुढील मार्गाने बाहेर काढण्याची नामुष्की ओढवली. ३० डिसेंबर २०१४ ला या रुग्णालयाने शेवटची ओसी घेतली होती. त्यानंतर महापालिकेच्या दप्तरी बांधकामासंबंधी कोणतीही नोंद आढळत नाही, असे नगर रचना विभागातून सांगण्यात आले. त्यामुळे हे बांधकाम अनधिकृत आहे हे स्पस्ट होते. विशेष म्हणजे वसई भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी जानेवारी महिन्यातच शहरातील सर्व आस्थापनांचे फायर ऑडिट करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आयुक्त गंगाथरन डी. यांनी पालिकेच्या आस्थापनांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश काढले होते. मात्र, या आदेशात खासगी आस्थापनांबाबत स्पष्टता नव्हती, असे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांचे म्हणणे आहे.
‘भाई मुझे बचाओ’
nवसई : माझ्या लहान भावावर विजय वल्लभ रुग्णालयात कोविडवर उपचार सुरू होते. रात्री आगीची घटना घडली तशी त्याने जीव मुठीत घेत रुग्णालयाचे टेरेस गाठले व मला फोन केला. मी पोचलो, त्याला शोधतोय, मात्र पोलीस आम्हाला आतच जाऊ देत नव्हते. दुपारभर आम्ही वेड्यासारखे चौकशी करत होतो.
nमाझा भाऊ कुठे आहे? अखेर समजले, मात्र आता त्याला मी कुठे नेऊ? हे रुग्णालय व प्रशासन इतर रुग्णांना इतरत्र हलविण्याबाबतीत खोटे बोलत आहे. सर्व हॉस्पिटलमध्ये बेड फुल आहेत. काय करू तेच समजत नाही. आमचे एकच सांगणे आहे, आम्हाला मदत करा, अशी विनंती एका रुग्णाचा नातेवाईक करीत होता.