ई-महासेवेच्या नावाखाली ‘दुकानदारी’
By admin | Published: October 10, 2015 11:34 PM2015-10-10T23:34:47+5:302015-10-10T23:35:17+5:30
कोसबाड येथे नागरिकांना विविध दाखलेवाटप करण्यासाठी तहसील कार्यालय, डहाणू यांच्यामार्फत एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात उत्पन्नाचे, जातीचे तसेच
घोलवड : कोसबाड येथे नागरिकांना विविध दाखलेवाटप करण्यासाठी तहसील कार्यालय, डहाणू यांच्यामार्फत एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात उत्पन्नाचे, जातीचे तसेच शिधापत्रिकेत नवीन नाव समाविष्ट करणे, कमी करणे व इतर दाखले, कागदपत्रांची पूर्तता करून तत्काळ देण्यात येणार होते. त्यामुळे वेळ तसेच आर्थिक खर्चाची बचत होणार होता. सोयीस्कररीत्या एकाच ठिकाणी एका दिवसात दाखले मिळण्यासाठी जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले असले तरी कोसबाड येथील शिबिरात ई-महासेवेच्या नावखाली नागरिकांची लूटच करण्यात आली.
दाखले वाटपाच्या नावाने दुकानदारी करणाऱ्या या ई महासेवा केंद्राचा चालक शिबिराच्या ठिकाणी येऊन कोऱ्या फॉर्मची १० ते २० रुपयांना विक्री करीत होता. दाखले विनामूल्य वाटप करण्यात यावे, असा जरी उद्देश असला तरी या ई महा सेवा केंद्रचालकांकडून प्रत्येक दाखल्याचे ५० रु. घेण्यात आले. दाखले त्याच दिवशी मिळणे अपेक्षित असताना पैसे घेऊनसुद्धा त्यांनी दाखले आजतागायत वाटप केले नाही. संबंधित अधिकाऱ्याने काही दाखल्यांवर त्याच दिवशी सह्या केल्या नाहीत. नागरिक आजही दाखल्यांची वाट बघत आहेत, मात्र दाखले वाटप होणार कधी, हे अनुत्तरितच आहे. काही विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता असताना ते मिळू शकले नाहीत. अर्ज भरण्याची शेवटची तारीखसुद्धा निघून गेली, अशी खंत पालकांनी व्यक्त केली.
कोसबाड येथील सामाजिक कार्यकर्ते त्या ई महा सेवा केंद्रचालकाशी मोबाइलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांना, त्यांना उडवाउडवीची व उद्धट शब्दांत उत्तरे दिली गेली. दाखले नेमके कधी मिळणार, याविषयी माहिती न देता दिशाभूल केली जात आहे, असा आरोप येथील नागरिकांचा आहे. ग्रामीण आदिवासी भागात तहसील कार्यालयामार्फत आयोजित करण्यात येणारी शिबिरे नेमकी नागरिकांच्या सोयीसाठी व फायद्यासाठी राबवली जातात की पैसे घेणाऱ्या ई महा सेवा केंद्रधारकांसाठी, अशी चर्चा सध्या येथे सुरू आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच प्रांतांनी तातडीने लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.
(वार्ताहर)
बोईसरला बोगस आधारकार्ड बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
बोईसर : येथील धोडीपूजाच्या चंदन अपार्टमेंटमध्ये अपुरी कागदपत्रे असतानाही चारशे रु. घेऊन आधारकार्ड देणाऱ्या टोळीचा बोईसर पोलिसांनी पर्दाफाश केला असून तिन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांना पालघर न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची (१२ आॅक्टोबरपर्यंत) पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
यातील दोन आरोपी आधारकार्ड काढण्याकरिता कॉम्प्युटर आॅपरेटर म्हणून कार्यरत होते. हे दोघे धोडीपूजा येथील एका दुकानाच्या मालकाशी संगनमत करून पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातून कोणतीही परवानगी न घेता उपलब्ध साधनांचा वापर करून बोगस आधारकार्ड केंद्र चालवत होते. या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास बोईसर पोलीस करीत आहेत.
या शिबिरांचा मूळ उद्देश साध्य होत आहे की नाही, गरजूंना दाखल्यांचे वाटप वेळेवर होते की नाही, याविषयी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
- रनेश पानतल्या,
सामाजिक कार्यकर्ता, कोसबाड