औषधांचा तुटवडा, रुग्णांचा रुग्णालयांत मुक्काम वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 10:54 PM2021-04-25T22:54:35+5:302021-04-25T22:54:45+5:30

बाहेरच्यांना बेड मिळेना : कोरोना रुग्ण बरे होण्यास लागतोय वेळ

Shortage of medicines, increased stay of patients in hospitals | औषधांचा तुटवडा, रुग्णांचा रुग्णालयांत मुक्काम वाढला

औषधांचा तुटवडा, रुग्णांचा रुग्णालयांत मुक्काम वाढला

Next

पंकज राऊत 

बोईसर : कोरोना  विषाणूची प्राथमिक लक्षणे दिसून येत नाहीत. सुरुवातीचे काही दिवस घरच्या घरी घेतलेला थातूरमातूर उपचार  व औषधोपचाराला यश  न  आल्यानंतर कोरोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांत खाट मिळविण्यासाठी  प्रचंड धावपळ व  परिश्रम करावे लागत आहेत. यानंतर मोजक्याच रुग्णांना जेमतेम खाट  मिळतात, परंतु  तेथे आधीच ऑक्सिजनबरोबरच अत्यावश्यक असलेल्या अनेक  औषधांच्या तुटवड्यामुळे दाखल झालेले रुग्ण बरे होण्यास विलंब होऊन त्यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढत असल्याचे दिसून आले आहे.

अत्यंत आवश्यक असलेल्या शेकडो  रुग्णांना वेळेवर खाटा उपलब्ध होत नसल्याने त्यांचाही आजार धोक्याची पातळी गाठून ते गंभीर होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. नागरिकांच्या निष्काळजी व  बेजबाबदारपणाबरोबरच दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीला संबंधित यंत्रणेला आलेली काहीशी मरगळ व गाफील राहिलेली यंत्रणा,  काही गोष्टींच्या नियोजनात झालेली दिरंगाई आणि समन्वयाच्या  अभावामुळे  पालघर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भाग  कोरोनाच्या विळख्यात सापडला असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्येत भर पडत आहे.

उपचार करणाऱ्या कोविड रुग्णालयांची तुटपुंजी संख्या, साधे बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, औषधे, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा, आदी सर्व महत्त्वाच्या सोयी-सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने एकूणच सर्व यंत्रणेवर प्रचंड ताण येऊन सर्वत्र गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने कोरोना रुग्णांचा बरे होण्याच्या  कालावधीत वाढ होत आहे. रोज नव्याने आढळणाऱ्या रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध होत नसल्याने परिस्थिती गंभीर होत आहे. 

वसई महापालिका क्षेत्रात प्रतिदिन सुमारे ८०० ते  हजार रुग्ण आढळत आहेत. त्यानंतर पालघर नगरपरिषद क्षेत्र व बोईसरबरोबरच तालुक्यातील इतर गावांमध्येही कोरोना आज मोठ्या प्रमाणात हात पसरवत आहे. मागील काही महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावापासून दूर असलेले जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड या ग्रामीण तालुक्यांतील  पाडेच्या पाडे  आज कोरोनाच्या  भयंकर विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आहे.

Web Title: Shortage of medicines, increased stay of patients in hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.