गळक्या मुख्यालयात बसावे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 11:35 PM2019-08-01T23:35:18+5:302019-08-01T23:35:24+5:30
बांधकामाबाबत व्यक्त केली नाराजी : ‘लोकमत’च्या वृत्ताची घेतली दखल
पालघर : पालघर जिल्ह्याचे सध्या बांधकाम सुरू असलेले मुख्यालय गळके असल्याच्या ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत राज्यमंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी या निर्माणाधीन मुख्यालयाला भेट दिली. जिल्हा मुख्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील गळती आणि निकृष्ट कामाचे चित्रीकरणच ‘लोकमत’ने त्यांच्यासमोर सादर केल्यानंतर ते अवाक झाले.
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाच्या उभारणीसह अन्य दोन प्रशासकीय कार्यालयाच्या कामाची जबाबदारी घेतलेल्या सिडकोचे कार्यकारी अभियंते सतीश देशपांडे, एम.एस.खंडाळकर आणि भरत काजळे यांना चित्रफिती दाखवून अशा गळक्या व निकृष्ट मुख्यालयात आपण आम्हाला बसायला लावणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ही निकृष्ट कामे तत्काळ बंद करून या कामावर देखरेख ठेवण्यासाठी एखादा सक्षम अधिकारी नेमण्याबाबत सिडको व्यवस्थापकाना पत्र लिहिण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालय पोटमाळ्यासह अन्य २ मजले तयार असून गळतीचे प्रमाण थेट पोटमाळ्यापर्यंत पोहोचले अहे. पूर्ण कार्यालयाचे बांधकामच निकृष्ट झाल्याने संपूर्ण इमारतच नव्याने उभारायला हवी, अशी जिल्हावासीयांची मागणी आहे. गुणवत्ता नियंत्रण कमिटीकडून या संपूर्ण बांधकामाची तपासणी करण्यात येईल, असेही पालकमंत्री चव्हाण यांनी लोकमतला सांगितले. या निकृष्ट कामासंदर्भात आपण स्वत: सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांची भेट घेणार असल्याचेही ते म्हणाले. पालघर जिल्ह्याचा ५ वा वर्धापन दिन असल्याने बंदरे, मच्छिमार विभागाचे राज्यमंत्री तथा जिल्हा पालकमंत्री चव्हाण यांनी सकाळी १० वाजता पालघर मुख्यालयाच्या इमारतीला भेट देत बांधकामाची पाहणी केली. कामाला उशीर होत असल्याबद्दल चव्हाण यांनी खेद व्यक्त करताच लवकरच आम्ही या मुख्यालयाचे काम पूर्ण करून देऊ असा विश्वास सिडको अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना दिला.