गटशिक्षणाधिकाऱ्यांसह १३ जणांना कारणे दाखवा
By admin | Published: December 30, 2016 04:16 AM2016-12-30T04:16:37+5:302016-12-30T04:16:37+5:30
शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र मांक १ मधील संरक्षक भिंतीचे लोखंडी गेट कोसळून झालेल्या अपघातात एका विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाला तर दोन
वाडा : शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र मांक १ मधील संरक्षक भिंतीचे लोखंडी गेट कोसळून झालेल्या अपघातात एका विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाला तर दोन विद्यार्थी जबर जखमी झाल्याची घटना घडली होती. तिला जबाबदार धरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांसह सात जणांवर निलंबनाची कारवाई केली होती. आज पालघर जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी संगिता भागवत यांनी वाडा गट शिक्षणाधिकारी कृष्णा जाधव व विस्तार अधिकारी ज्ञानदेव निपुर्ते यांच्या सहित तेरा शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
या संदर्भात अधिक वृत्त असे की, वाडा शहरातील शिवाजीनगर भागा लगत असलेल्या जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा वाडा क्र मांक१ व प्राथमिक शाळा वाडा क्र मांक २ या शाळा एकाच ठिकाणी भरत आहेत. या शाळांच्या संरक्षक भिंतीचे जीर्ण झालेले लोखंडी गेट कोसळून प्राथमिक शाळा वाडा क्र मांक १ मधील इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकणार्या तन्वी धानवा या विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाला . तर शैलेश संजय चव्हाण व अंजू शिवकुमार प्रसाद हे विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. त्यातच या घटनेचे विधानसभा अधिवेशनातही पडसाद उमटल्याने या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले होते. त्याचप्रमाणे या घटनेसंदर्भात शाळा प्रशासनाविरुद्ध वाडा पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदविण्यात आला आहे.
या घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, जिल्हा शिक्षणाधिकारी संगिता भागवत यांनी घटनास्थळी भेट देऊन वस्तुस्थितीची पहाणी केली होती. त्यानंतर केलेल्या प्रशासकीय चौकशीत एका केंद्रप्रमुखासह सात जणांना निलंबित केले होते. (वार्ताहर)
आरोप तेच फक्त कारवाईत केला बदल
विद्यार्थ्यांची सुरक्षा विषयक काळजी न घेणे, जेवणाच्या मधल्या सुट्टीत घरी जाणे, धोकादायक बांधकाम वरिष्ठांच्या निदर्शनास न आणून देणे, धोकादायक ठिकाणांपासून खेळण्यास विद्यार्थ्यांना परावृत्त न करणे आदी कारणांसाठी काहींना निलंबित केले आहे.
साधारण याच मुद्द्यावरून गट शिक्षणाधिकारी कृष्णा जाधव व विस्तार अधिकारी ज्ञानदेव निपुर्ते यांच्यासह महेश गोतारणे, कविता ठाकरे, धनश्री पाटील, माधुरी पवार, निलम पाटील, प्रतिभा गोतारणे, सुप्रिया पाटील, वैशाली पष्टे, संगिता ठाकरे, मनीषा जाधव व सुनील मोरे अशा एकूण तेरा शिक्षक व शिक्षिकांना जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीस दिली आहे. तिचे उत्तर सात दिवसांत द्यायचे आहे.