साहित्यिकांना नोटिसा बजावणाऱ्या ‘त्या’ पोलिसांना अखेर कारणे दाखवा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 06:29 AM2019-04-18T06:29:02+5:302019-04-18T06:29:11+5:30
कवी, साहित्यिक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा पाठविणा-या पोलिसांना वरिष्ठांनी आता कारणे दाखवा नोटिसा बजाविल्या आहेत.
वसई : येथील कवी, साहित्यिक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा पाठविणा-या पोलिसांना वरिष्ठांनी आता कारणे दाखवा नोटिसा बजाविल्या आहेत. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध नोंदविण्यात येत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी विविध संघटनांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून उपद्रव मूल्य असणाºया आणि ज्यांच्याकडून कायदा-सुव्यवस्था बिघडेल अशाच व्यक्तींना कलम १४९ अन्वये प्रतिबंधात्मक नोटिसा पाठविण्यात येतात. त्यात वसई-विरारमधून ८०४ जणांना वसई पोलिसांकडून नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. प्रसिद्ध कवी सायमन मार्टीन तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मार्कुस डाबरे यांनादेखील सोमवारी सायंकाळी नोटिसा पाठविल्याने सर्वच क्षेत्रांतून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. अखेर त्याच रात्री जनक्षोभामुळे उशिरा पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी या नोटिसा मागे घेण्याचे आदेश दिले.
एकूणच हा प्रकार गंभीर आहे. त्यामुळे ज्या पोलिसांनी या नोटिसा काढल्या त्यांना आम्ही कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे पोलीस अधीक्षक सिंग यांनी मंगळवारी सांगितले.
>‘लेखी आश्वासन द्या’
सोमवारी रात्री पोलीस अधीक्षकांनी कवी, साहित्यिकांवरील नोटिसा मागे घेण्याचे आदेश दिले होते. मंगळवारी सकाळी पोलीस सायमन मार्टीन यांच्या घरी नोटीस मागे घेण्यासाठी गेले. मात्र लेखी आश्वासन द्या त्याशिवाय नोटीस परत करणार नाही, असे मार्टीन यांनी सुनावल्यानंतर पोलीस माघारी फिरले. या प्रकारामुळे साहित्यिक, सुजाण नागरिकांच्या डोक्यावर टांगती तलवार आल्याचे मार्टीन यांनी म्हटले.