डहाणूतील श्रीजी इमारत अखेर झाली रिकामी, लोकमतच्या वृत्ताची गंभीर दखल : पोलीस व नगरपालिका प्रशासनाचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 01:28 AM2017-10-13T01:28:52+5:302017-10-13T01:28:58+5:30
या शहरातील सर्वात जुनी व भर बाजारपेठेत असलेल्या अतिधोकादायक श्रीजी अपार्टमेंटच्या तळ मजल्यामधील सहा दुकाने ‘लोकमत’मध्ये बातमी आल्यानंतर डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर, पोलीस निरिक्षक सुदाम शिंदे, तसेच डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी
शौकत शेख
डहाणू : या शहरातील सर्वात जुनी व भर बाजारपेठेत असलेल्या अतिधोकादायक श्रीजी अपार्टमेंटच्या तळ मजल्यामधील सहा दुकाने ‘लोकमत’मध्ये बातमी आल्यानंतर डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर, पोलीस निरिक्षक सुदाम शिंदे, तसेच डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनोद डवले यांच्या प्रयत्नाने दोन दिवसांत रिकामी करण्यात आल्याने नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे.
डहाणूच्या सागरनाका येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या या इमारतीत ४८ पेक्षा जास्त निवासी सदनिका व अनेक गाळे तळमजल्यावर बांधण्यात आले होते. मात्र बांधकाम निकृष्ट असल्यामुळे ही इमारत जास्त काळ सुरक्षित राहिली नाही. परिणामी इमारतीचा बहुसंख्य भाग खचला व इमारतीमध्ये अनेक छोटी छोटी झाडे वाढून इमारतीच्या बाहेरील दर्शनी भागात पूर्णत: भग्न झाला होता. मोठया प्रमाणात पडझड झाल्याने ही इमारत कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे रेल्वे स्टेशन, डहणूगाव, चारोटीकडे जाणाºया रस्त्यांवरून जाणाºया येणाºयांच्या जिवितास धोका निर्माण झाल्याने डहाणू नगर परिषदेकडे ती पाडून टाकण्याची मागणी सतत केली जात होती. परंतु पालिका प्रशासन केवळ पावसाळयांत नोटीसा पाठवून हात वर करीत होती. कालांतराने श्रीजी इमारतीमधील सर्व सदनिकाधारकांना फ्लॅट खाली केले परंतु, तळमजल्यावरील सहा दुकानदारांनी आपले दुकान सुरूच ठेवल्याने दररोज खरेदीसाठी मोठया प्रमाणात तिथे गर्दी होत होती.श्रीजी इमारत कोसळल्यास मोठया प्रमाणात जीवीत हानी होणार असे वृत्त लोकमतेने प्रसिध्द केल्याने पोलीस व नगर परिषद प्रशासन खडबडून जागे झाले. डहणू पोलीस व नगर परिषद प्रशासनाने महावितरणला वीज कनेक्शन काढून टाकण्याचे आदेश दिल्यानंतर गाळेधारकांनी धावपळ केली व दोन दिवसांत सहा दुकाने खाली करवून घेण्यात प्रशासनाला यश आले. लवकरच ही इमारत पाडण्यात येणार आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना टळणार असून लोकमतने याबाबतीत आवाज उठविल्याबद्दल ने येथील नागरिक व मच्छिमार कार्यकर्ते हरेश मर्दे यांनी लोकमतचे आभार मानले.