जव्हारच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट
By admin | Published: November 15, 2016 04:10 AM2016-11-15T04:10:24+5:302016-11-15T04:10:24+5:30
येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल हे खाते सोडले तर अन्य कोणतेच खाते नसल्याने येथे सदैव शुकशुकाटच असतो
जव्हार : येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल हे खाते सोडले तर अन्य कोणतेच खाते नसल्याने येथे सदैव शुकशुकाटच असतो.
ठाणे जिल्ह्याचे विभाजन होवून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यावर येथील अनेक खाती पालघर येथे हलविण्यात आली आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून येथील नागरिकांच्या समस्या सुटत नाहीत.
आदिवासींच्या सर्वागीण विकासासाठी नवीन पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी जव्हार, मोखाडा, विक्रमगड या तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सुटाव्यात यासाठी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातील एकही खाते स्थलांतरीत केले जाणार नाही असे शासनाने आश्वासन दिले होते. परंतु, तसे न झाल्याने जव्हारच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट पसरला आहे.
पालघर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात हलविण्यात आलेल्या खात्यांचा कार्यभार जव्हारच्या कार्यालयातूनच चालवा अशी मागणी येथील आदिवासी नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे जव्हारच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात पुरवठा विभाग आणि महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अशा दोन विभागांचा कार्यभार कायम ठेवावा अशी मागणी येथील आदिवासींनकडून केली जात आहे. १९९२-९३ साली जव्हार तालुक्यातील वावर वांगणी येथे शेकडो बालके कुपोषणाच्या विळख्यात सापडली होती. तर अनेक कुपोषित बालके मृत्युमुखी पडली होती. त्यावेळी तात्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी वावर वांगणी या गावाला तात्काळ भेट देवून येथील समस्या जाणून घेवून जव्हार येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू केले होते. पुरवठा व रोहोयो या दोन खात्यांचा कार्यभार जव्हारच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यातून चालत असल्याने, येथील नागरिकांना रोजगाराची संधी निर्माण झाली होती. आणि आदिवासी ग्रामीण भागातील आदिवासींच्या समस्या काही प्रमाणात सुटत होत्या. मात्र ही खाती पालघरला स्थलांतरीत करण्यात आल्याने आता समस्या जैसे थे रहात आहेत. त्यामुळे किमान पुरवठा विभाग व रोजगार हमी योजना असा दोन खात्यांचा कार्यभार तरी जव्हारच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातून चालावा अशी मागणी आदिवासींकडून केली जात आहे. याबाबत पालकमंत्र्यांनाही त्यांच्या समाजबाधंवांनी साकडे घातले आहे.
(वार्ताहर)