लाॅकडाऊनमुळे बसला वसईतील गोशालांनाही फटका; गायींचे केले स्थलांतर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2020 02:02 AM2020-12-03T02:02:14+5:302020-12-03T02:02:33+5:30
वसई ते विरार या पट्टीत चार ते पाच गोशाला आहेत. तर, त्यापुढील भागात २० हून अधिक गोशाला आहेत.
विरार : काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्य नागरिक, कामगार यांच्यासोबतच गोशालांनाही बसला आहे. सुरुवातीच्या तीन महिन्यांत चारापाण्याअभावी अनेक गायींचे स्थलांतर अन्य जागेत करावे लागल्याचे वसईफाटा येथील हनुमान लक्ष्मीधाम गोशालेचे दीप वनखंडी महाराज यांनी सांगितले.
वसई ते विरार या पट्टीत चार ते पाच गोशाला आहेत. तर, त्यापुढील भागात २० हून अधिक गोशाला आहेत. या गोशालांमध्ये हजारो गायी-बैल व अन्य पशूंची देखभाल केली जाते. या पशूंना दररोज शेकडो टन खाद्य लागते. हनुमान लक्ष्मीधाम गोशालेतच सव्वाशे गायी आहेत. अनेक दानशूर व्यक्ती आणि प्राणिप्रेमी व्यक्ती देत असलेल्या देणगीतून हे पशुखाद्य उपलब्ध होत असते. कडक लॉकडाऊनकाळात सर्वच सेवा ठप्प झाल्याने गोशालांना पशुखाद्य उपलब्ध होण्यात अडचणी आल्या.
वाडा येथे केले ३५ गायींचे स्थलांतर
हनुमान लक्ष्मीधाम गोशालेतील ३० ते ३५ गायींचे स्थलांतर वाडा येथील गोशालेमध्ये केल्याची माहिती या गोशालेत सेवा देणारे लाला महाडिक-पाटील यांनी सांगितले. या गोशालेत कच्छ-भूज या दुष्काळी भागातून आणलेल्या तब्बल ८० गायी आहेत, असे दीप वनखंडी महाराज म्हणाले.