कोरोनानंतरचे साईड इफेक्ट, औषधे काळजीपूर्वकच घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 08:43 AM2021-05-11T08:43:48+5:302021-05-11T08:44:34+5:30
जिल्ह्यात कोरोनावर मात करणाऱ्या लोकांमध्ये तरुणांपासून ज्येष्ठांचाही समावेश आहे. यातील काही मंडळी कोरोनातून पूर्णपणे बरी होऊन पुन्हा आपल्या कामाला लागली आहेत.
जगदीश भोवड -
पालघर : पालघर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. संपूर्ण जिल्ह्यात आजवर ९७ हजारहून अधिक लोक कोरोनामुळे बाधित झालेले आहेत, मात्र त्याच वेळी ७८ हजारहून जास्त लोकांना कोरोनावर मात केली असल्याने समाधानही व्यक्त होत आहे. दरम्यान, या जीवघेण्या आजारातून जे लोक बरे होऊन घरी परतले आहेत, त्यातील डायबिटीससारखे आजार असलेल्या काही मंडळींना कोरोनानंतरचे साईड इफेक्ट जाणवू लागले आहेत. यामुळे योग्य ती औषधे घेऊन आपली तब्येत व्यवस्थित ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञ मंडळींकडून दिला जात आहे.
जिल्ह्यात कोरोनावर मात करणाऱ्या लोकांमध्ये तरुणांपासून ज्येष्ठांचाही समावेश आहे. यातील काही मंडळी कोरोनातून पूर्णपणे बरी होऊन पुन्हा आपल्या कामाला लागली आहेत. परंतु काही मंडळींना कोरोनानंतरचे साईड इफेक्ट होत असल्याच्या तक्रारी सुरू आहेत. सध्या मे महिना सुरू असल्याने बाहेर सूर्यदेव आग ओकत आहेत. तापमान वाढलेले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना उष्णतेचा त्रास होत आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या शरिरातही उष्णता वाढते. ही उष्णता सहन होत नाही. घाम येतो तसेच अचानक चीडचीड निर्माण होते, असेही अनेक रुग्णांकडून ऐकायला मिळते. दरम्यान, काही रुग्णांच्या बाबतीत तक्रारी ऐकायला मिळत नाहीत. पूर्वीसारखेच सर्वसामान्य आयुष्य ते जगत आहेत. आपल्याला कोणताही त्रास होत नसल्याचे अनेक रुग्णांनी सांगितले. तरीही ही मंडळी योग्य ती काळजी घेताना दिसत आहेत.
जिल्ह्यामध्ये प्रशासकीय यंत्रणा आणि आरोग्य विभाग कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. डॉक्टर मंडळी, परिचारिका, तसेच आरोग्य सेवक आपल्या जीवावर उदार होऊन कोरोना रुग्णांच्या सेवेत राहून जास्तीत जास्त लोक या जीवघेण्या आजारातून बरे कसे होतील, याची काळजी घेत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश येत असल्यामुळे आजवर ९० टक्केपेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचेही दिसून आले आहे.
nकोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधला असता, शरिरात उष्णता वाढण्याच्या, इतरांपेक्षा जास्त घाम येण्याच्या आणि चिडचिडेपणाच्या तक्रारी वाढल्या असल्याचे सांगण्यात आले.
nही मंडळी जीवघेण्या आजारावर मात करून बरी झाली आहेत. आता या साईड इफेक्टवरही मात करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
रेमडेसिविरचे साईड इफेक्ट
कोरोना विषाणूची बाधा झालेल्या अनेक रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन घ्यावे लागत आहे. काही रुग्णांना तर १०-१२ रेमडेसिविर इंजेक्शने घ्यावी लागली आहेत, तर काहींना पाच-सहा इंजेक्शन दिली गेली आहेत. रेमडेसिविर इंजेक्शनसह अन्य औषधोपचारांमुळे आणि सकारात्मक विचारांमुळे अनेकांनी कोरोनाला हरवण्यात यश मिळवले आहे. मात्र कालांतराने या औषधांचे साईड इफेक्टही होताना दिसत आहे.
घरी सोडल्यानंतरही उपचार
डायाबिटीस असलेल्या रुग्णांना थोड्याफार प्रमाणात त्रास जाणवतो. घरी सोडण्यात आले तरी उपचार सुरूच असतात. त्यामुळे वाड्यातील पोशेरी कोविड सेंटरमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांना काही साईट्स इफेक्ट झालेला एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
- डॉ. संजय बुरपुले, आरोग्य अधिकारी, वाडा तालुका