बविआमध्ये मोठ्या फेरबदलांचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 11:21 PM2019-05-24T23:21:19+5:302019-05-24T23:21:23+5:30

आत्मपरीक्षण : अध्यक्ष हितेंद्र ठाकुरांनी केले

Significant fluctuations in Bavia | बविआमध्ये मोठ्या फेरबदलांचे संकेत

बविआमध्ये मोठ्या फेरबदलांचे संकेत

Next

वसई : सर्व अनुकुलता असतांनाही बविआचे उमेदवार बळीराम जाधव यांचा पराभव झाल्यामुळे बहुजन विकास आघाडीच्या संघटनेत तातडीने मोठे फेरबदल होणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत.


वसई नालासोपारा, बोईसर या तिनही विधानसभा मतदारसंघात बविआचे आमदार होते. तसेच अन्य कोणत्याही पक्षापेक्षा बविआची संघटनाही मजबूत होती. तरीही जाधवांचा पराभव घडल्याने वैतागलेल्या आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या पराभवाला मी एकटाच जबाबदार आहे अशी भूमिका घेतली आहे.


परंतु खाजगीत मात्र त्यांनी या पराभवामागील सत्य सांगितले आहे ते म्हणाले की, ज्यांना मी कार्यकर्ता म्हणायचो , मानायचो ते कार्यकर्ते आपल्या मतदारांना काळजीपूर्वक मतदानासाठी बाहेर काढतील मतदान घडवून आणतील अशी माझी समजूत होती. परंतु आता माझ्या लक्षात येते आहे की, पक्षातले अनेक कार्यकर्ते आता ठेकेदार, शेठ, झालेले आहेत. ते आता वातानुकुलीत केबीनमध्ये बसून आदेश देण्यात धन्यता मानतात. परंतु रस्त्यावर उतरून पक्ष कार्य करणे त्यांना योग्य वाटत नाही. त्यांच्यात तेवढी धमकही उरलेली नाही.
या पार्श्वभूमीवर जर विधानसभा निवडणुकीत चित्र बदलायचे असेल तर त्यासाठी संघटनात्मक बदल करण्याशिवाय अन्य पर्यायच उरलेला नाही. हे स्पष्ट दिसते आहे.


त्यामुळेच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची तातडीची बैठक घेऊन संघटनात्मक बदल घडवून आणणे हा मार्ग अनुसरण्याशिवाय अन्य उपाय उरलेला नाही. शिवसेना आणि भाजपा यांची युती विधानसभा निवडणुकीसाठीदेखील कायम राहणार आहे हे शिवसेना भाजपाने गुरूवारीच जाहीर केले आहे. या आव्हानाचा मुकाबला करायचा असेल तर पक्षसंघटनेत नवचैतन्य निर्माण करणे आवश्यक आहे. ते घडविण्यासाठी संघटनेत फेरबदल हा इलाज वापरावा लागणार आहे. जर ते केले गेले नाही तर संघटनेचा प्रभाव टिकविणे खूपच आव्हानात्मक होऊन बसेल. त्यामुळेच संघटनेत बदल घडवून संपूर्ण पक्षालाच योग्य तो संदेश देणे हे ठाकूर यांना महत्वाचे वाटते आहे. आता हे बदल कधी होतात व त्यात कोणाचे पद जाते व कोणाची नव्याने वर्णी लागते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
शिट्टी हे निवडणूक चिन्ह गोठविण्याचा जो प्रकार झाला त्यामुळे बविआ आधीच खवळलेली होती. त्यात आता या पराभवाची भर पडली आहे. वास्तविक सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकमुखी पाठिंबा दिलेला असतांना जाधव यांचा विजय बविआला निश्चित वाटत होता. तरीही तसे घडून आले नाही.


पराभवाच्या धक्क्यातून बविआ अद्यापही सावरलेली नाही. शुक्रवारीही बविआच्या गोटात सर्वत्र अस्वस्थ शांतता होती. आता पुढे काय? हाच प्रश्न सर्व नेते आणि कार्यकर्ते यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. परंतु त्याचे उत्तर मात्र कोणाच्याही जवळ नव्हते. विधानसभा निकालाचे चित्र खूपच वेगळे असेल व त्यातून बविआला नवी उभारी मिळेल असा आशावाद पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात व्यक्त केला जातो आहे. परंतु तो कृतीत कसा उतरवायचा याबाबत पक्षाध्यक्षांकडेच पाहिले जाते आहे.


जय -पराजय सुरूच असतात
राजकारणात एका पराजयाने कोणीही संपत नाही, जय पराजय सुरूच असतात. त्यामुळे हा पराजय झाला तरी बविआ आपले प्रभावी स्थान पुन्हा प्राप्त करेल
-पदाधिकारी बविआ


या पराभवाला फक्त मीच जबाबदार
माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी अत्यंत मेहनतीने काम केले, सर्व मित्र पक्षांनी मनापासून प्रचार केला. त्यामुळे चूक कोणाचीच नाही. या पराभवाची जर कुणावर काही जबाबदारी असेल तर ती फक्त पक्षाध्यक्ष म्हणून माझ्यावर आहे. बाकी कुणावरही नाही. असे माझे स्पष्ट मत आहे. आता काहीजण म्हणतात की, सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर केला. म्हणून हा पराभव झाला. ते तर सगळ्या जगाने पाहिले आहे. आमचे चिन्ह गोठविण्याचा जो प्रकार झाला तो सत्तेचा गैरवापरच होता. आता त्यांच्या हातात सत्ता होती त्यांनी तिचा गैरवापर केला. सत्तेचा वापर करा गैरवापर करू नका.
-आमदार हितेंद्र ठाकूर, अध्यक्ष बविआ

Web Title: Significant fluctuations in Bavia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.