भगिनी समाज : महिलांची एक आदर्श शैक्षणिक संस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 11:56 PM2021-03-07T23:56:07+5:302021-03-07T23:56:27+5:30

१३०० विद्यार्थ्यांना केले जाते ज्ञानदान

Sister Society: An ideal educational institution for women | भगिनी समाज : महिलांची एक आदर्श शैक्षणिक संस्था

भगिनी समाज : महिलांची एक आदर्श शैक्षणिक संस्था

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : स्वातंत्र्यपूर्व काळात महिला या चार भिंतीत अडकलेल्या असताना कै. बाबासाहेब दांडेकर त्यांच्या पत्नी रमाबाई दांडेकर तसेच भागीरथीबाई दांडेकर, जानकीदेवी बजाज यांनी उभारलेल्या भगिनी समाज संस्थेच्या रोपट्याचे महाकाय डेरेदार वृक्षात रूपांतर झाले आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील १ हजार ३०० विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे कार्य आजही महिला पदाधिकारी, शिक्षिका करीत आहेत.

पालघरमध्ये सन १९३० या स्वातंत्र्यपूर्व काळात भगिनी समाज संस्थेची स्थापना झाली. तेव्हा स्त्रियांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी होते. घराच्या बाहेर पडून एकत्र येऊन काही समाजोपयोगी कार्य करणे ही कल्पनाच नवीन होती. अशा विपरीत परिस्थितीत अनेक महिलांनी एकत्र येत भगिनी समाज संस्थेची स्थापना केली. भगिनींना एकत्र करीत त्यांचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, शैक्षणिक उन्नती करणे, त्यांच्या कलाशक्तीचा उपयोग समाजाच्या सेवांसाठी करून घेणे, एवढाच प्राथमिक उद्देश होता. कुठल्याही राजकीय पक्षाशी संलग्न न राहता फक्त समाजोपयोगी कार्य स्त्रियांकडून करून घेणे व ते करताना कुठलेही धर्मभेद, जातिभेद, उच्च-नीच, श्रीमंत-गरीब असा कुठलाच भेद पाळला जात नाही. आजही अनेक समाजोपयोगी उपक्रम तालुका व जिल्ह्यातील महिलांसाठी राबविले जातात. पालघरसारख्या एका खेडेगावात आधुनिक शिक्षण देणाऱ्या बालमंदिराची स्थापना १ एप्रिल १९४९ रोजी ताराबाई मोडक यांच्या हस्ते करण्यात आली. पालघरच्या पंचक्रोशीतील पालकांच्या आग्रहास्तव बालमंदिरातून मुले मोठी झाल्यावर शिक्षणाची सोय व्हावी, याकरिता शकुंतला दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली सन १९७० साली प्राथमिक शाळेची स्थापना केली. काळानुरूप शाळेबद्दलची विश्वासार्हता वाढू लागल्याने पालक आपली मुले शाळेमध्ये पाठवू लागले. २००५ साली भाग्यश्री दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली माध्यमिक विद्यालयाची स्थापना झाली. आजघडीला भगिनी समाज संस्थेच्या बालमंदिर, प्राथमिक व माध्यमिक विभागात जवळपास तेराशे विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.

संस्थेच्या अध्यक्षा माधुरीताई परुळेकर, उपाध्यक्षा तसेच शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा जयश्री सत्तीकर, सेक्रेटरी दीपिका सावले, सल्लागार व मार्गदर्शक वसुमती चित्रे व सदस्य आशा पुरंदरे, भाग्यश्री दांडेकर, अंजली दीक्षित, उषा माळी, दीपा लोखंडे ,नीता प्रभू, वैशाली रहाळकर, अश्विनी कुलकर्णी, निर्मला वर्तक, प्रभावती सामंत आदी भगिनी समाज संस्थेची धुरा सांभाळत आहेत. तसेच बालमंदिर विभागाच्या मुख्याध्यापिका राजश्री दांडेकर व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रीती वर्तक आणि माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रणिता वर्तक यांच्या सहकार्याने शाळेची यशस्वी वाटचाल चालू आहे.

Web Title: Sister Society: An ideal educational institution for women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.