गोविंद पानसरे हत्येप्रकरणी पालघरमध्येही एसआयटी स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 06:31 AM2019-04-15T06:31:12+5:302019-04-15T06:31:14+5:30
मॉर्निंग वॉकला जाताना गोळ्या झाडून हत्या करून फरार झालेल्या दोन आरोपींना शोधण्यासाठी पालघर जिल्ह्यातही शनिवारी एक पोलीस अधिकारी व तीन पोलीस हवालदार यांच्या एसआयटी पथकाची शनिवारी स्थापना करण्यात आली आहे.
नालासोपारा : कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध कॉम्रेड गोविंद पानसरे यांची १६ फेब्रुवारी, २०१५ साली मॉर्निंग वॉकला जाताना गोळ्या झाडून हत्या करून फरार झालेल्या दोन आरोपींना शोधण्यासाठी पालघर जिल्ह्यातही शनिवारी एक पोलीस अधिकारी व तीन पोलीस हवालदार यांच्या एसआयटी पथकाची शनिवारी स्थापना करण्यात आली आहे.
पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राकेश साखरकर, पोलीस हवालदार मंगेश चव्हाण, अमोल कोरे, शरद पाटील हे या पथकात आहेत. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी बॅनर, पोस्टर जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत लावण्यात येतील, तसेच रेल्वे स्टेशन परिसर, रेल्वेतही पोस्टर लावणार असल्याचे पथकाकडून सांगण्यात आले. या आरोपींबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास, त्यांनी पालघर स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे तपास पथकाचे प्रमुख आणि सहायक पोलीस निरीक्षक राकेश साखरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले आहे.