लोकसभेसाठी भाजपामध्ये बंडाळीची स्थिती, कार्यकर्ते नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 04:05 AM2019-03-18T04:05:20+5:302019-03-18T04:05:41+5:30
पालघर लोकसभा मतदार संघात भाजपाचे वर्चस्व असतांना तो युतीच्या जागा वाटपात शिवसेनेला देण्याच्या निर्णया विरोधात जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या राजीनामा सत्रा नंतर आता...
- हितेन नाईक
पालघर - पालघर लोकसभा मतदार संघात भाजपाचे वर्चस्व असतांना तो युतीच्या जागा वाटपात शिवसेनेला देण्याच्या निर्णया विरोधात जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या राजीनामा सत्रा नंतर आता तलासरीतील प्रसिद्धी प्रमुख लुईस काकड यांनी लोकसभेत कमळ चिन्हाचा उमेदवार उभा ना राहिल्यास आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे पत्र भाजप प्रदेशाध्यक्षाना पाठविले आहे.
लोकसभा पुनर्रचने पूर्वी पासून या भागात राम नाईकांच्या रूपाने भाजप चे वर्चस्व राहिले होते. त्यांच्या सोबत दिवंगत खासदार चिंतामण वणगा यांनी तलासरी भागातील सिपीएम पक्षाशी एक हाती झुंज देत विक्र मगड, जव्हार, मोखाडा भागात पक्षाच्या बळकटीसाठी आपले पूर्ण आयुष्य वेचले होते.
या जिल्ह्यात भाजप चे दोन आमदार, आदिवासी विकासमंत्री, जिल्हा परिषद, नगरपालिकेवर भाजपा ची सत्ता असतांना भाजप- सेना युतीच्या चर्चेत पालघर लोकसभा मतदार संघ शिवसेनेला देण्यात आल्याचे कळविण्यात आले. केंद्रात नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान म्हणून सत्ता मिळवून देण्यासाठी एक एक खासदार महत्वाचा असल्याचे कारण देत आपला परंपरागत मतदार संघ आपण सेनेला देत असल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी अलीकडच्या पालघरच्या भेटीत दिले होते.
या निर्णया विरोधात जिल्ह्यातील सर्व बूथ अध्यक्षा सह अनेक पदाधिकाऱ्यांंनी आपले राजीनामे वरिष्ठांकडे पाठवल्या नंतरही वरिष्ठां कडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने ग्रामीण भागातील कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. तलासरीचे आदिवासी आघाडीचे प्रसिद्धी प्रमुख लुईस काकड यांनी पक्षाच्या या निर्णया विरोधात बंडाचा झेंडा रोवला असून तलासरी मध्ये १९९२ पासून पक्षाचे काम करीत असल्याचा राग मनात धरून सिपीएम ने माझे घरदार उध्वस्त केल्याचे त्यांनी सांगितले.
‘कुठल्याही परिस्थितीमध्ये सेनेचे काम करणार नाही’
तलासरी येथे जिल्हाध्यक्ष पास्क ल धनारे यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या बैठकीत जिप, पस, ग्राप सदस्यांनी शिवसेनेला उमेदवारी देण्याच्या निर्णयाचा ठामपणे विरोध केल्याने सेनाही संभ्रमात आहे.
आम्ही कुठल्याही परिस्थितीत सेनेचे काम करणार नसल्याचे सांगून एवढेच होते तर पक्षाने या पूर्वीच श्रीनिवासला उमेदवारी दिली असती तर हा प्रश्नच निर्माण झाला नसता असे काकड यांनी लोकमत ला सांगितले.
आम्ही आयुष्यभर सिपीएमशी संघर्ष केला. आता शिवसेनेशी संघर्ष करून एकमेकांची डोकी फोडतच बसायचे का? वरिष्ठांनी कार्यकर्त्यांचा सन्मान राखून ही जागा सेनेला देऊ नये.
- लुईस काकड,
प्रसिद्धी प्रमुख