घरात झोपणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण, भूकंपाच्या धक्क्याने वृद्धेचे घर कोसळले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 11:24 PM2019-12-21T23:24:37+5:302019-12-21T23:25:20+5:30
रात्र काढावी लागते थंडीवाऱ्यात। भूकंपाच्या धक्क्याने वृद्धेचे घर कोसळले
कासा : डहाणू-तलासरी तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी घरात झोपणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण ठरत आहे. दरम्यान, बुधवारी पहाटे झालेल्या भूकंपाच्या धक्क्याने डहाणू तालुक्यातील शिसने पांढरतारा (पाटीलपाडा) येथील धानी ननहीं बोदले (७६) या महिलेचे घर कोसळले. सुदैवाने ही महिला बचावली असून किरकोळ जखमी झाली आहे.
परिसरातील नागरिकांची घरे ही विटा-मातीपासून तर काहींची घरे लाकूड-कारवीच्या कुडापासून बनवली आहेत. मात्र गेल्या दीड-दोन वर्षापासून भूकंपाचे धक्के सातत्याने बसत असल्याने सर्वांच्या मनात भीती दाटलेली आहे. सध्या थंडीचा काहूर सुरू असताना रात्री घराबाहेर झोपणेही कठीण आहे. तरीही येथील नागरिकांना जीव मुठीत धरून घराबाहेर लहान मुलाबाळांसह सोबत झोपावे लागत आहे. यात जनावर, विंचू यांचीही भीती मनात असते. दुसरीकडे शासन दरबारी या नैसर्गिक आपत्तीची दखल घेतली जात नसल्याने नागरिक चिंतेत आहेत.
‘सतत सुरू असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांच्या भीतीमुळे अनेक नागरिक स्थलांतर करू लागले आहेत. आमच्या घराच्या भिंतींना मोठे तडे गेले आहेत. भूकंपाचा मोठा धक्का बसला तर घरांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.
- तान्हा भरभरे, स्थानिक नागरिक