नायगाव उड्डाणपुलाचा उतार खचला, गुणवत्ता दर्जा तपासण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 12:43 AM2021-02-03T00:43:20+5:302021-02-03T00:43:45+5:30
Naigaon flyover : एक महिन्यापूर्वी सोपारा खाडीवरील पुलाचे पायलिंग न करता ठेकेदाराने आरसीसी ब्लॉक उभा केला होता. त्यामुळे पुलाचा एक भाग खचला होता.
पारोळ - मागील महिन्यात नायगाव पूर्वेतील सोपारा खाडीपुलाचा एक भाग खचल्याची घटना ताजी असताना आता नव्याने सुरू असलेल्या नायगाव उड्डाणपुलाचा उतार भाग खचल्याने एमएमआरडीए प्रशासन नागरिकांच्या व वाहनचालकांच्या जीवाशी खेळत असल्यामुळे कमालीचा संताप व्यक्त होत आहे.
एक महिन्यापूर्वी सोपारा खाडीवरील पुलाचे पायलिंग न करता ठेकेदाराने आरसीसी ब्लॉक उभा केला होता. त्यामुळे पुलाचा एक भाग खचला होता. याप्रकरणी मोठा गदारोळ माजल्यानंतर बांधकाममंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीचे पुढे काय झाले ते अद्याप गुलदस्त्यात असताना आता नायगाव उड्डाणपुलाचा भागही खचल्याने ठेकेदाराच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, सोपारा खाडीपुलाच्या घटनेनंतर एमएमआरडीए प्रशासनामार्फत सुरू असलेल्या नायगाव पूर्व-पश्चिम उड्डाणपुलाचे बांधकाम ठेकेदाराने तपासले असता नायगाव पूर्व भागात खाडीपुलाच्या उतारभागालगत असलेला उड्डाणपुलाचा एक भाग खचल्याचे निदर्शनास आले. याबाबत कोणाला कानोकान खबर लागण्याआधीच ठेकेदाराने जेसीबीच्या साह्याने तो संपूर्ण भाग खोदून टाकण्यात आला आहे.
२०१५ साली नायगाव पूर्व-पश्चिम या उड्डाणपुलाचे काम सुरू झाले आहे. पुलाचे काम सुरू असतानाच दोन वर्षांनी २०१७ रोजी पुलाच्या पश्चिमेकडील दोन भागांतील गर्डरचे काम कोसळले होते. त्यानंतर काही दिवसांनी पश्चिम भागातीलच एका बाजूला तडा गेला होता. या दोन्ही पुलांचे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने संबंधित ठेकेदारांकडून करण्यात येत आहे. हा नागरिकांच्या जीवाशी जाणीवपूर्वक खेळ मांडला जात असल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
नागरिकांच्या जीवाला अपाय होण्याचा धोका
निकृष्ट दर्जाच्या कामामुळे भविष्यात जर दोन्ही पुलांचे काम कोसळले तर त्यामुळे नागरिकांच्या जीवाला अपाय होण्याचा धोका संभवतो. मोठी जीवितहानी होईल अशी भीती व्यक्त होत आहे. या नव्या उड्डाणपुलामुळे वसई ते मुंबई हे अंतर २५ कि.मी.ने कमी होणार आहे. मात्र दोन्ही पुलांच्या सुरक्षिततेबाबत आणि त्यांच्या बांधकामांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.