औद्योगिक पट्ट्यात मंदीचा धूर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 12:34 AM2019-10-16T00:34:50+5:302019-10-16T00:35:32+5:30
वाड्यात अनेक कारखाने बंद : हजारो कामगार होतायत बेकार; कारखान्यांचे उत्पादन ५० टक्क्यांवर
वाडा : जागतिक मंदीचा जोरदार फटका वाडा तालुक्यातील कारखानदारांना बसत असून मंदीमुळे उद्योजकांचे कंबरडे मोडत आहे. वाडा औद्योगिक पट्ट्यातील एकेक कारखाना मंदीमुळे बंद होऊन हजारो कामगार बेकार होत आहेत. तसेच कारखान्यांचे उत्पादन निम्म्यावर आले असून कामगार कपातही सुरू आहे. ओव्हरटाइम देणेही बंद केल्याने कामगारांतही नाराजीचा सूर आहे.
वाडा तालुक्यातील मागास आणि आदिवासी भागाचा विकास व्हावा, गरीब आणि आदिवासींना रोजगार मिळावा या उद्देशाने डी प्लस झोन ही योजना तत्कालीन सरकारने १९९२ मध्ये जारी केली. त्यावेळी उद्योगांना १३ वर्षे विक्री करात सूट, आयकरात सूट, उद्योजक शेतकरी नसला तरी जमीन नावावर होणे, वीज बिलात सूट तर प्रकल्प खर्चाच्या ३० टक्क्यांपर्यंत सरकारकडून रोख सबसिडी आणि इतर अनेक सवलती देण्यात आल्या. त्यामुळे उद्योजकांनी आपला मोर्चा वाड्याकडे वळवला. हजारो कारखानदारांनी येथे आपले बस्तान बसवले. वाड्यात आलेले कारखाने हे प्लास्टिक पिशव्या (कॅरी बॅग) पासून ते कपड्यांपर्यत, टाचणीपासून ते भांड्यांपर्यत, मोटारगाड्यांचे पार्ट, विमानाचे भाग, शीतपेये, टी.व्ही., फ्रीज, लोखंड उत्पादन करणारे आहेत.
वाड्यात लोखंडाचे उत्पादन करणाऱ्या ४० टक्के कंपन्या असून आशिया खंडातील लोखंडाची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून वाड्याचा उल्लेख केला जातो. मात्र अलीकडच्या काळात सरकारने सबसिडी बंद करून विजेचे दर भरमसाठ वाढवल्याने लोखंडाची ही बाजारपेठ नष्ट होते की काय, असा प्रश्न भेडसावतो आहे.
जागतिक मंदीचा फटका सध्या वाडा औद्योगिक पट्ट्यात बसत असून अनेक कारखाने यामुळे बंद झाले आहेत तर काही होत आहेत. खरीवली येथे समर्थ एअरकॉन या कंपनीत २०० कामगार काम करीत आहेत. येथे फॅब्रिकेशनचे काम केले जाते. २४ तास तीनही शिफ्टमध्ये या कंपनीचे कामकाज चालायचे. मात्र या मंदीमुळे एका शिफ्टमध्येच ही कंपनी चालवली जाते. या कंपनीतील ५० टक्के काम कमी झाल्याची माहिती मिळाली. वैष्णव इस्पात ही कंपनी वसुरी येथे असून येथे लोखंडाचे उत्पादन केले जात होते. कंपनीत सुमारे ५०० च्या आसपास कामगार काम करीत होते. मात्र अवाजवी वीज बील आणि मंदी यामुळे ही कंपनी काही दिवसांपूर्वीच बंद करण्यात आली आहे. हीच परिस्थिती सोलो मेटलची आहे. या कंपनीतही ४०० ते ५०० कामगार काम करीत होते. मंदीचा फटका या कंपनीलाही बसल्याचे बोलले जाते.
गोºहे येथील कलिष्मा इंड्रस्टीज ही कंपनीही काही महिन्यापूर्वी बंद झाली. येथे ६०० च्या आसपास कामगार काम करीत होते. या कंपनीत नट-बोल्डचे उत्पादन केले जायचे. मात्र आॅटोमोबाइल कंपन्यांमधील काम कमी केल्याने त्याचा परिणाम या कंपनीवर झाला आहे. दिनकर पाडा येथे खाप्रा मेटल ही कंपनी होती. येथे तांब्याचे उत्पादन घेतले जायचे मात्र मंदीमुळे या कंपनीला कुलूप लागले आहे. या कंपनीत १०० च्या आसपास कामगार होते. कुडूस ग्रामपंचायत हद्दीतील धोडीया सिंटीट्यँक लि. ही कंपनीही काही दिवसांपूर्वीच बंद करण्यात आली आहे. कपड्यांच्या धाग्याचे उत्पादन केल्या जाणाºया या कंपनीत एक हजारांच्या आसपास कामगार होते. कोंढले येथे डिसर्च पेंटाकल कंपनी बंद झाली असून येथील ४० कामगार बेकार झाले आहेत. जयगणेश, डेल्टा प्रा.लि. या कंपन्याही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मुसारणे ग्रा.पं.च्या हद्दीतील हॉरिबगर कंपनीतही कामगार कपात केली आहे. तर गाला प्रेसिजन कंपनीतही उत्पादन निम्म्याने घटले.
काही नवीन कंपन्यांनी येथे जागा घेऊन बांधकाम केले आहे. मंदीमुळे दिनकर पाडा येथील व्ही.एस.के., कोंढले येथील टॅग आय एचएसआयएनजी इंड्रस्टीज, वरूण ग्रीड कंपनी या कंपन्या उत्पादन सुरू करू शकत नाहीत.
पूर्वी आमची कंपनी २४ तास सुरू असायची. मात्र मंदीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून आमचे उत्पादन ५० टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे आम्ही फक्त आठ तास कंपनी चालवत असून कामगारांना ओव्हरटाइम पूर्णपणे बंद केला आहे. त्यामुळे कामगारही नाराजी व्यक्त करीत आहेत.
- पी.टी.हिवाळे, व्यवस्थापक, समर्थ एअरकॉन प्रा.लि.
आमच्या कंपनीत ५० टक्के काम कमी झाले आहे. आत्तापर्यंत आम्ही कामगारात कपात केलेली नाही. पण पुढे करणे अत्यंत जरूरीचे आहे. परिस्थिती अंत्यत खराब असून आॅटो सेक्टर पूर्णपणे डाऊन झाले आहे.
- तुकाराम बेहरे, व्यवस्थापक, गाला प्रेसिजन इंजिनीअरिंग