दुचाकीविक्रेत्यांवर मंदीचे सावट; ऐन सणासुदीच्या दिवसात व्यावसायिकांवर संक्रांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 12:56 AM2019-08-24T00:56:06+5:302019-08-24T01:17:57+5:30
देशभरात पसरलेल्या मंदीच्या सावटाचे मोठे परिणाम जिल्ह्यातील अनेक व्यावसायिकांसह आॅटोमोबाईल उद्योग, वाहन विक्री व्यवसायावरही पडले आहेत.
- हितेन नाईक
पालघर : देशभरात पसरलेल्या मंदीच्या सावटाचे मोठे परिणाम जिल्ह्यातील अनेक व्यावसायिकांसह आॅटोमोबाईल उद्योग, वाहन विक्री व्यवसायावरही पडले आहेत. अनेक सणांच्या निमित्ताने होणारे वाहनांचे बुकिंग सध्या होत नसल्याने व्यावसायिकांसह त्यांच्याशी निगडीत कामगार वर्गावर कपातीची टांगती त्तलवार आहे. जीएसटीसह लादण्यात आलेल्या मोठ्या जाचक अटी याला कारणीभूत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यातील बांधकाम व्यवसाय, त्या अनुषंगाने येणारे वास्तूविशारद, रंगारी, गवंडी, रेती-विटा व्यावसायिक, जमीन खरेदी - विक्री, औद्योगिक क्षेत्र, मत्स्यव्यवसाय, डायमेकर, अन्नाशी संबंधित व्यवसाय, आॅटोमोबाईल उद्योग आदी अनेक व्यवसायावर मंदीचे वादळ घोंगावत आहे. या वादळामुळे मध्यमवर्गीय आणि सामान्य नागरिकांच्या जीवनात अनेक समस्या आहेत. त्यांना रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करावा लागत असून खाजगी नोकरदार वर्गही मेटाकुटीला आला आहे. खाजगीकरणाच्या धोक्यामुळे आपली नोकरी टिकून राहील की नाही याचे दडपण सातत्याने असल्याचे महेश मेहेर सांगतात.
सध्या श्रावण महिना, मग गणेशोत्सवानंतरचा पितृ पंधरवड्याचा कालावधी सोडला तर थेट दिवाळीपर्यंत लागून सण आहेत. या काळात नेहमीच काही ना काही खरेदी होते. त्यामुळे चांगला व्यवसाय होईल या आशेवर व्यावसायिक असतात. जिल्ह्यात साधारणपणे आॅटोमोबाईल उद्योगाची संख्या मोठी असून त्यांच्याशी निगडीत स्पेअर पार्ट, आॅटो रिपेअर आदी हजारो कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून आहेत. या मंदीमुळे भारतातील आॅटोमोबाईल उद्योगांच्या उत्पादनांमध्ये व विक्र ी व्यवसायावर परिणाम झाला असला तरी जिल्ह्यातील बहुतांश दुचाकी, चारचाकी वाहन विक्रीमध्ये ही घट ३० ते ३५ टक्के झाली असल्याचे नलीन मोटर्सचे मालक नलीन उपाध्याय यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
गेल्यावर्षी पर्यंत या दुचाकी सुमारे २ हजारापर्यंत विकल्या जायच्या, मात्र यंदा एका वर्षात केवळ १ हजार २०० विक्र ी झाल्याचे एसटीएस होंडा शोरूमचे मालक धनंजय संखे यांनी सांगितले.
सध्या मंदीचे मोठे सावट या वाहन व्यवसायावर असले तरी रोज बदलती शासन धोरणे याला जबाबदार असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
चुकीची धोरणे भोवली
मोटर परिवहन विभागाचे वाहन शुल्क ७ टक्क्यांहून थेट ११ टक्क्यांपर्यंत वाढविल्याचा परिणाम दुचाकी विक्रीवर आढळून येतो. दुचाकी घेतल्यानंतर असलेला विमा हा ५ वर्षांपर्यंतचा करून त्यापोटी सुमारे ५ हजाराहून अधिकचे शुल्क भरण्यास ग्राहक तयार नाहीत. शासनाची काही चुकीची धोरणे यामुळे आधीच विक्रीवर त्याचा परिणाम झाला आहे. वाहने आणि त्याच्या सुट्या भागावरील जीएसटी, बीएस- ३ नंतर झालेला परिणाम, शासनाचे वाढलेले शुल्क यांमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.
काही वर्षांपासून वाहन विक्र ीचा ग्राफ वेगाने खाली घसरत आहे. शासनाने व्याजाचे दर कमी करताना दुसरीकडे जीएसटी कमी करायला हवा नाहीतर मोठ्या प्रमाणात मंदी वाढून बेरोजगारीमधील वाढ परवडणारी नाही.
- नलीन उपाध्याय, नलीन मोटर्स, मुंबई
विम्याची रक्कम भरताना एक वर्षाच्या ऐवजी ५ वर्षाचे इन्शुरन्स काढण्याचा नियम, शासनाने वाढवलेले रोड टॅक्सचे अवाढव्य दर, जिल्ह्यात स्थायिक असल्याचा पुरावा नसल्याने अन्य राज्यातील ग्राहकांच्या गाडी नोंदणीत येणाऱ्या जाचक अटींच्या अडचणी याचा एकत्रित परिणाम वाहन विक्रीवर झाला आहे.
- धनंजय संखे, मालक-एसटीएस होंडा, पालघर