वसई-विरार महापालिका निवडणुकीआधीच धूमशान!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 01:42 AM2021-02-08T01:42:11+5:302021-02-08T01:42:36+5:30

देवेंद्र फडणवीस यांच्या १० सभा; शिवसेनेची धुरा एकनाथ शिंदेंवर

Smoke before Vasai-Virar municipal elections! | वसई-विरार महापालिका निवडणुकीआधीच धूमशान!

वसई-विरार महापालिका निवडणुकीआधीच धूमशान!

Next

विरार : वसई-विरार महापालिकेची आगामी निवडणूक सर्वच पक्षांनी कधी नव्हे ती प्रतिष्ठेची बनवली आहे. आतापर्यंत बहुजन विकास आघाडीच्या हातात असलेली महापालिकेची सत्ता हिसकावून घेण्यासाठी शिवसेना आणि भाजप स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात मोर्चेबांधणी करताना दिसत आहे.

बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मात्र या वेळी सर्वच्या सर्व म्हणजेच ११५ पैकी ११५ जागा निवडून आणण्याचे आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. मात्र आमदार हितेंद्र ठाकूर यांचे शिवसेना-भाजप यांना थेट असलेले आव्हान मोडीत काढण्यासाठी भाजप आणि शिवसेनेनेही स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात मोर्चेबांधणी केल्याची माहिती आहे.

या रणनीतीचा भाग म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १० सभा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे दोन रोड शो वसईत आयोजित करण्याच्या विचारात आहे.

विशेष म्हणजे भाजपचे विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांनी मागील वसई दौऱ्यात भाजप पालिकेच्या सर्वच जागा लढवणार असून; आगामी महापौर भाजपचाच असेल, अशी घोषणा करून कार्यकर्त्यांत स्फुल्लिंग पेटवले होते. याचे पुढचे पाऊल म्हणून वसई भाजपने नुकतीच आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या घरासमोरून बाइक रॅली काढून आपले शक्तिप्रदर्शन केले होते.

दरम्यान, वसई शिवसेना तालुकाप्रमुख निलेश तेंडोलकर यांनी शिवसेनेची संपूर्ण धुरा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व पालघर संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांच्यावर असेल, असे सांगतानाच पालिकेत शिवसेनेचीच सत्ता असेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना कार्यकर्त्यांना बळ देण्याच्या अनुषंगाने वसई शिवसेनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेनेचे जिल्हाप्रमुखपद हे पालघर जिल्ह्यात आहे. त्यामुळे शिवसेना वसई-विरार शहर जिल्हाप्रमुख असे आणखी एक पद निर्माण करून कार्यकर्त्यांना बळ देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Web Title: Smoke before Vasai-Virar municipal elections!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.