अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुटख्याची तस्करी, भाजीपाला-गुटख्यासह ट्रक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 02:50 AM2020-04-29T02:50:07+5:302020-04-29T02:50:10+5:30
वाहतूक नियंत्रण शाखा आणि मनोर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी भाजीपाल्याबरोबरच गुटखा भरलेला हा ट्रक पकडून तो जप्त करण्यात आला आहे.
आरिफ पटेल
मनोर : सध्या संपूर्ण देशात लॉकडाउन असून सर्व राज्ये आणि जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. मात्र, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरई सातीवली येथे ‘अत्यावश्यक सेवा’ लिहिलेल्या एका भाजीपाल्याच्या ट्रकला अडवून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा असल्याचे आढळून आले. वाहतूक नियंत्रण शाखा आणि मनोर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी भाजीपाल्याबरोबरच गुटखा भरलेला हा ट्रक पकडून तो जप्त करण्यात आला आहे. हा ट्रक अपघातग्रस्त झाल्याने हा प्रकार उघड झाला.
गुजरातहून मुंबईत दररोज मोठ्या प्रमाणावर जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणारी वाहने येतात. असाच भाजीपाला घेऊन जाणारा ट्रक पालघरमधील सातीवली येथे चालकाचा ताबा सुटल्याने उलटला. तेव्हा भाजीपाल्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा लपवून ठेवलेला आढळला. मनोर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून एकूण ३५ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
लॉकडाउनच्या काळात सर्व राज्यांच्या, तसेच जिल्ह्यांच्याही सीमा सील केल्या आहेत. तपासणीसाठी ठिकठिकाणी पोलीस तैनात आहेत. नागरिकांची उपासमार होऊ नये, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी शासनाने अशा वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना परवानगी दिली आहे. मात्र, त्याचा गैरफायदा काही ट्रकचालक-मालक घेत असल्याचे दिसून येते आहे.