वाड्यात पोलिसांच्या निवासस्थानांचे १० वर्षांपासून भिजत घोंगडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 12:09 AM2021-04-22T00:09:55+5:302021-04-22T00:10:01+5:30
तालुक्यात ६० वर्षांपूर्वी बांधलेल्या घरांची पूर्ण पडझड : पोलिसांना राहावे लागते महागड्या भाड्याच्या घरांत
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : जनतेच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. वाड्यातील पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न गेल्या १० वर्षांपासून रेंगाळत पडल्याने येथील सर्वच पोलिसांवर महागड्या भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे.
वाडा पोलीस ठाण्यालगत पोलीस ठाण्याच्या मालकीची दोन एकरहून अधिक जागा आहे. या जागेवर ६० वर्षांपूर्वी बांधलेल्या पोलिसांच्या निवासस्थानांची पूर्ण पडझड झाली आहे. सध्या या जागेला जंगलाचे स्वरूप आले आहे. येथे राहाण्यालायक एकही खोली सुस्थितीत नसल्याने सध्या या जागेचा उपयोग गुन्हे
कामात पकडलेल्या गाड्या ठेवण्यासाठी पोलीस खात्याकडून केला जात आहे.
या ठिकाणी अस्तित्वात असलेले पोलीस अधिकाऱ्यांचे निवासस्थान व २७ हून अधिक खोल्यांची पडझड झाली आहे. उंदीर, घुशी, साप, डुकरे तसेच मोकाट जनावरे व कुत्री यांच्याकडूनच या निवासस्थानांचा सध्या उपयोग केला जात आहे.
गेल्या १० वर्षांपासून या निवासस्थानांची दुरवस्था झालेली असतानाही येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने या निवासस्थानाच्या नव्याने करावयाच्या बांधकामाकडे दुर्लक्ष केले आहे. निवासस्थानांची दुरवस्था झाल्याने या ठिकाणी सध्या एकही पोलीस कुटुंब राहात नाही. ही निवासस्थाने सोडून येथील सर्व पोलिसांवर आज महागड्या भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारकडून मिळणाऱ्या घरभाड्याच्या तिप्पट रक्कम खाजगी निवासासाठी देण्याची वेळ येथील ९५ पोलीस व पाच पोलीस अधिकाऱ्यांवर आली आहे.
जागा फायदेशीर
वाडा येथे पोलिसांच्या निवासासाठी दोन एकर क्षेत्र असलेली जागा उपलब्ध आहे. ही जागा पोलीस ठाण्याच्या नावावर आहे. आहे. या जागेची सापसफाई करून या ठिकाणी भव्य निवासस्थान बांधले तर सर्वच पोलिसांसाठी तसेच अधिकाऱ्यांसाठी निवासाची व्यवस्था होऊ शकते. तसेच ही जागा पोलीस ठाणे लगतच असल्याने पोलिसांसाठी ते खूप फायदेशीर ठरणार आहे.
वाडा पोलीस ठाण्याच्या नावावर असलेल्या या जागेवर हाऊसिंग सोसायटीच्या माध्यमातून पोलीस निवासस्थाने बांधण्याचा प्रस्ताव सुरू असून लवकरच तो मार्गी लागेल. - सुधीर संखे, पोलीस निरीक्षक, वाडा.
सरकारी निवासस्थान नसल्याने मिळणाऱ्या पगारातील २० टक्के रक्कम घरभाड्यासाठीच जात असल्याने महिनाभराचा संसारगाडा चालविताना मोठी कसरत करावी लागते. - एक पोलीस कर्मचारी