‘बोलीभाषांमुळे सामाजिक एकोपा टिकून’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 01:39 AM2017-08-03T01:39:44+5:302017-08-03T01:39:44+5:30
वसईमध्ये अनेक जाती-धर्मांची परंपरा आहे. जिव्हाळा जपणाºया बोलीभाषांमुळे वसईतील सामाजिक एकोपा टिकून राहिला आहे. आपल्या पूर्वजांशी संवादी भाषा एकच होती याची प्रचिती बोलीभाषांमधून मिळते
वसई : वसईमध्ये अनेक जाती-धर्मांची परंपरा आहे. जिव्हाळा जपणाºया बोलीभाषांमुळे वसईतील सामाजिक एकोपा टिकून राहिला आहे. आपल्या पूर्वजांशी संवादी भाषा एकच होती याची प्रचिती बोलीभाषांमधून मिळते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी वसईत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वसई शाखेने आयोजित केलेल्या बोलीभाषा कवी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बी. ए. खरवडकर, कोमसापचे जिल्हाध्यक्ष नंदन पाटील, महापालिकेचे सभागृह नेते फ्रँक आपटे, स्थायी समितीचे माजी सभापती संदेश जाधव उपस्थित होते. जगात साडेसहा हजार भाषा बोलल्या जातात. त्यात मराठीचा पंधरावा क्रमांक लागतो. तर आपल्याकडे मराठीला पुरक अशा बाराशे बोलीभाषा बोलल्या जातात. भाषा भावना असते. त्यामुळे ती कधीच अशुद्ध असू शकत नाही. ती पवित्रच असते. विचार करण्याचे वा स्वत:शी संवाद साधण्याचे माध्यम बोलीभाषा असते. हा आत्मसंवाद जोपर्यंत टिकून आहे तोपर्यंत मराठीला मरण नाही, असेही डॉ. कार्व्हालो यांनी यावेळी बोलताना सांगितले.
विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्या तदर्थ समितीच्या अध्यक्षपदी काम करणाºया डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेच्या अभ्यासक्रमात नव्याने ज्यांच्या साहित्याचा समावेश करण्यात आला त्या रेमंड मच्याडो, स्टँन्ली घोन्सालवीस, स्टिफन परेरा, सिरील मिनेजीस यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कवी संमेलनात वाडवळ, मालवणी, आगरी, सामवेदी, कुपारी, वºहाडी, खानदेशी, वंजारी, कुणबी, सुर्यवंशी, कादोडी, गणबोली (लेवा पाटील) आदी बोली भाषेतील कविता कवींनी सादर केल्या. स्वागत शेखर धुरी व संगीता अरबुने यांनी केले.