वसईतील समाजवादी नेते डॉ. भाई सामंत यांचे निधन
By admin | Published: March 27, 2017 05:24 AM2017-03-27T05:24:50+5:302017-03-27T05:24:50+5:30
वसई तालुक्यातील जुन्या पिढीतील समाजवादी नेते डॉ. भाई सामंत यांचे काल तळेगाव येथे निधन झाले.
वसई : तालुक्यातील जुन्या पिढीतील समाजवादी नेते डॉ. भाई सामंत यांचे काल तळेगाव येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे.
डॉ. सामंत वसई तालुक्यात घराघरात ओळखले जात. माजी आमदार स्व. पंढरीनाथ चौधरी आणि डॉ. सामंत या जोडीला पाहिले की प्रशासनाला धडकीच बसायची. सत्पाळा येथे त्यांचा दवाखाना होता. त्यांच्याकडे येणारे पेशंट आपल्या समस्याही घेऊन यायचे. त्यामुळे डॉ. सामंत औषधोपचारासह लोकांच्या समस्यांवरही इलाज करायचे. माजी आमदार स्व. प्रा. स. गो. वर्टी, डॉ. मधुकर परुळेकर, डॉमणिक घोन्सालवीस, वा. ग. वर्तक, नवनीतभाई शहा यांच्यासमवेत त्यांना जिल्हाभर काम केले.डॉ. सामंत मुलूख मैदान तोफ होते. प्रजा समाजवादी-जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पडली होती. वसई तालुक्यातील प्रत्येक चळवळ, आंदोलनावर डॉ. भाई सामंत यांचे नाव कोरले गेले. सध्या डॉ. सामंत यांचा मुक्काम पुणे येथील तळेगाव येथे होता. तेथून ते वसईच्या चळÞवळी आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात होते. शेकडो समाजवादी मनावर ठसा उमटवणाऱ्या डॉ. सामंत यांच्या निधनाने ठाणे आणि पालघर जिल्हयातील समाजवादी चळवळीत हळहळ व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
कन्येचे नाव ठेवले होते मिसा
त्या काळात पंतप्रधान इंदिरा गांधींनी मिसा कायदा लागू करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना बंदीवासात ठेवले होते. त्यावेळेच्या आणिबाणीत भाईंनाही १९ महिन्यांचा तुुरुंगवास घडला होता. त्यावेळी डॉ. सामंत यांनी आपल्या मुलीचे नाव मिसा ठेवले. त्याची आठवण आज सगळ्यांना झाली.