शेतकऱ्यांना सौर विद्युत पंपाचा पर्याय उपलब्ध
By admin | Published: February 26, 2017 02:25 AM2017-02-26T02:25:09+5:302017-02-26T02:25:09+5:30
लोडशेडींगची कटकट. भरमसाठ वीज बिलाचा बोजा. शेती-वाडीच्या पाणी पुरवठ्याची चिंंता. या सर्वांतून बागायतदार आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा सौर उर्जेवरील
- शशी करपे, वसई
लोडशेडींगची कटकट. भरमसाठ वीज बिलाचा बोजा. शेती-वाडीच्या पाणी पुरवठ्याची चिंंता. या सर्वांतून बागायतदार आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा सौर उर्जेवरील विद्युत पंप वसईतील शनी मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे विजेची बचत, लोडशेडींगमधून सुटका, वीज बिलाची डोकेदुखी नाही, मेंटेनन्सही नाही उलट घरगुती वापरासाठीही वीज निर्मिती होऊ शकते अशा अनेक कारणास्तव उपयुक्त असा पंप शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दहा शेतकऱ्यांनी एकत्रितपणे एकदाच गुंतवणूक केल्यानंतर त्यांना वर्षाेनुवर्षे दमडाही न मोजता शेतीसह घरगुती वापरासाठीही वीज निर्मिती करता येणार आहे.
लोडशेडींगमुळे वसई तालुक्यायातील बागायतदार आणि शेतकऱ्यांना अनेक त्रासांचा सामना करावा लागतो. त्यातच भरमसाठ वीज बिलाची डोकेदुखीही असतेच. अनेकदा पाणी मुबलक असतांनाही वीजेअभावी शेतीला हव्या त्या प्रमाणात पाणी देता येत नसल्यामुळे उन्हाळी शेती करणे जड होऊन बसले आहे. वेळी अवेळी जाणाऱ्या विजेमुळे विद्युत मोटर बंद पडल्यामुळे शेतीवाडीला पाणी पुरवठा करण्यासाठी वसईतील शनि मंदिर ट्रस्टने हा प्रयोग केला.
विशेष म्हणजे हा सौरउर्जा संच शेतीवाडीतील मोकळ्या माळरानावर,घराच्या गच्चीवर आपण लावू शकतो.तसेच या सौरउर्जेसाठी लावण्यात येणाऱ्या पँनलद्वारे तयार होणारी अतिरीक्त विज सहा बँटऱ्यांद्वारे स्टोर करून रात्रीच्या वेळी घरातही वापरू शकतो.
गेली काही वर्षे सौरउर्जेवर आधारीत अनेक उपक्रम राबवले जात असतात. पर्यावरणासाठी महत्वाचे ठरणाऱ्या लाखो झाडांचे वाटप या करण्यात आले आहे.
दर शनिवारी प्रसादाच्या रूपात वनौषधी रोपांचे वाटप केले जाते. वसईतील शेतकऱ्यांना वरदान ठरणारे जी ९ या संकरीत टिश्श्यूकल्चर केळींच्या रोपांचे वाटप करण्यासाठी पुढाकार घेण्यात आलेला आहे. झाडे लावा व झाडे जगवा यासाठी वसईतील शेतकऱ्यांकरीता वेळोवेळी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजनही केले जाते.
पर्यावरणमित्र हा सह्याद्री फाऊंडेशनचा पुरस्कार प्राप्त झालेले जयवंत नाईक यांनी शेतकऱ्यांना विजेअभावी शेतीला पाणी देण्यासाठी या सौरउर्जेवर आधारीत विज जनित्र संचाचा वापर मोठ्या प्रमाणात करावा असे आवाहन केले आहे.
अशी केली साकारणी
- सौरउर्जेवर आधारित वीज जनित्र संच प्रायोगिक तत्वावर शेतजमीनीवरील विहीरींवर लावले आहेत. या सौरउर्जा संचात सोलर पॅनलचा वापर करण्यात आलेला असून, त्याद्वारे तयार होत असलेल्या विजेचा विहीरीवरील मोटर्सला पुरवठा केला जातो.
या संचासाठी २०० वॅटचे ९ पॅनल लावण्यात आलेले आहेत. ३ पॅनलच्या एका सिरीजद्वारे प्रति सेकंद ७२ वँट विजनिर्मीती होत असते.