सूर्यमाळ केंद्र ठरले तंबाखूमुक्त; मोखाड्यात पटकावला पहिला मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 12:38 AM2021-01-30T00:38:36+5:302021-01-30T00:38:43+5:30
जिल्हा परिषद शिक्षण विभाग पालघर, तंबाखू नियंत्रण उपक्रम कार्यक्रम, सलाम मुंबई फाउंडेशन व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा, खासगी शाळा, महाविद्यालयात तंबाखूमुक्त अभियान राबविण्यात आले आहे.
खोडाळा : मोखाडा पंचायत समिती अंतर्गत सूर्यमाळ केंद्रातील १०० टक्के शाळांनी तंबाखूमुक्त अभियानाचे सर्व ९ निकष पूर्ण करून तालुक्यातील पहिले तंबाखूमुक्त केंद्र ठरण्याचा मान सूर्यमाळ केंद्रास प्राप्त झाला आहे. सलाम मुंबई फाउंडेशनचे प्रतिनिधी, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यचे पालघर जिल्हा संघटक मिलिंद रूपचंद पाटील यांनी मोखाडा तालुक्यातील पहिले तंबाखूमुक्त केंद्र म्हणून सूर्यमाळ केंद्र घोषित केले आहे.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग पालघर, तंबाखू नियंत्रण उपक्रम कार्यक्रम, सलाम मुंबई फाउंडेशन व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा, खासगी शाळा, महाविद्यालयात तंबाखूमुक्त अभियान राबविण्यात आले आहे. यासाठी पालघर जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांची एक दिवसीय ऑनलाइन मार्गदर्शक कार्यशाळा घेण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) लता सानप आणि मोखाडा तालुक्यातील पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पाढंरे, शिक्षण विभागाचे विस्तारधिकारी रामचंद्र विशे यांनी लवकरात लवकर सर्व शाळा तंबाखूमुक्त करावेत, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार, सूर्यमाळ केंद्रातील सर्व शाळांनी सर्वच्या सर्व निकष पूर्ण करत, सूर्यमाळ केंद्राला पालघर जिल्ह्यातील पहिले तंबाखूमुक्त केंद्राचा बहुमान मिळवून दिला आहे.
मोखाडा पंचायत समिती अंतर्गत सूर्यमाळ केंद्रातील १०० टक्के शाळांनी तंबाखूमुक्त अभियानाचे सर्व निकष पूर्ण केले आहे. याकरिता मोखाडा तालुक्यातील राजेवाडी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र पांडुरंग विशे यांनी विशेष परिश्रम घेतले.