डहाणू नगरपरिषदेत घनकचरा कामगारांचा ठिय्या; कामगारांना दोन महिने पगारच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2021 12:05 AM2021-01-26T00:05:24+5:302021-01-26T00:05:34+5:30
श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली केले आंदोलन
डहाणू : डहाणू नगर परिषदेत घनकचरा व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला गेल्या तीन महिन्यांपासून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बिले मिळालेली नाहीत. परिणामी साफसफाई करणाऱ्या कामगारांना मजुरी न मिळाल्याने संतप्त कामगारांनी सोमवारी काम बंद करून डहाणू नगर परिषदेच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
डहाणू नगर परिषदेत घनकचरा व्यवस्थापनाचे काम करण्यासाठी नगरपरिषदेने ठेकेदाराला वार्षिक ठेका दिला आहे. ठेकेदाराकडे साफसफाई करण्यासाठी ५४ कामगार आहेत. मात्र ठेकेदाराकडून मागील दोन महिन्यांपासून सफाई कामगारांना वेतन अदा करण्यात आले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मागील वर्षी गणेशोत्सवाच्या तोंडावर असाच प्रसंग निर्माण झाला होता. त्यावेळी कामगारांनी शहरातील घाण, कचरा, गोळा न करता काम बंद आंदोलन केले होते. यावेळी पुन्हा कामगारांचे वेतन रखडल्याने थेट डहाणू नगरपरिषदेचे कार्यालयात ठिय्या आंदोलन करून तीव्र निषेध नोंदवला.
कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू असल्यामुळे नगरपरिषद कार्यालयात विविध कामासाठी येणाऱ्या लोकांचे दिवसभर हाल झाले. कामगारांना न्याय न मिळाल्यास संघटनेचे नेते विवेक विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली प्रजासत्ताक दिनापासून आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सचिव दिनेश पवार यांनी दिला आहे.
...अन्यथा तीव्र लढा
डहाणू नगर परिषदेमध्ये काम करीत असलेल्या या सफाई कामगारांना न्याय मिळाला नाही, तर संघटनेचे नेते विवेक विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली प्रजासत्ताक दिनापासून आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा श्रमजीवी संघटनेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.