गाणे म्हटले म्हणून विद्यार्थ्याला मारहाण
By admin | Published: March 27, 2017 03:54 AM2017-03-27T03:54:28+5:302017-03-27T03:54:28+5:30
डोल्हारा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीत शिकणाऱ्या सचिन उत्तम भालेराव या विद्यार्थ्याला ज्ञानेश्वर लक्ष्मण भोये या शिक्षकाने
मोखाडा : डोल्हारा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीत शिकणाऱ्या सचिन उत्तम भालेराव या विद्यार्थ्याला ज्ञानेश्वर लक्ष्मण भोये या शिक्षकाने शुक्र वारी ११.०० च्या दरम्यान तो मधल्या सुटीत गाणे म्हणत असल्याने संतापून छडीने मारहाण केली व त्याचे डोकेही भिंतीवर आपटले आहे.
मधल्या सुटीत सचिन हा मित्रांसोबत शाळेच्या ओट्यावर गाणी म्हणत होता. कोणतीच विचारपूस न करता भोये यांनी त्याला काठीने मारहाण केली. त्यानंतरही त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी विद्यार्थ्याच्या तोंडावर ठोसे लगावून त्याचे डोके भिंतीवर आपटले. यामुळे तो जखमी झाला आहे. हा प्रकार लाजिरवाणा व शिक्षक पेशाला काळिमा फासणारा असून त्या बाबत संताप व्यक्त होत असून या मारकुट्या शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्याचे आजोबा चंदर पालवे यांनी लोकमतशी बोलताना केली. (वार्ताहर)
मधल्या सुटीत शाळेच्या ओट्यावर गाणी म्हणत होतो. यावेळी भोयेसरांनी मला पाठीवर काठीने मारहाण केली. तोंडावर बुक्केही मारले.
सचिन भालेराव, विद्यार्थी
आम्ही पालकांची बैठक बोलाविली असून या शिक्षकांवर कारवाई करणार आहोत.
- भरत गारे, मुख्यध्यापक जिल्हा परिषद शाळा, डोल्हारा