निकालाचा दिवस येताच सर्वच पक्षांची, उमेदवारांची धाकधूक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 11:54 PM2018-05-30T23:54:26+5:302018-05-30T23:54:26+5:30
नेमका कौल कुणाला : सर्वच पक्ष दावा करतात आपलाच उमेदवार विजयी होण्याचा, मतदान यंत्रे कुणाच्या गळ्यात घालणार विजयमाला
विक्रमगड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या व पंचरंगी लढत असलेल्या मतदानाचा निकाल ३१ रोजी लागणार असल्याने सर्वच पक्षांची व उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. त्यात मतदानाचा टक्का घसरल्याने त्याचा फटका कुणाला बसणार? याबाबतही तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
२८ मे रोजी झालेल्या मतदानाच्या दिवशी अनेक ठिकणी इव्हीएम मशीनबंद पडल्याने त्यांचा मोठा परिणाम मतदानावर झाल्याने मतदानाची टक्केवारी घरसली असून अवघे ५३़२२ टक्के मतदान झाले़ त्यामध्ये सर्वात जास्त मतदान विक्रमगड विधानसभेमध्ये ६२.६४ याप्रमाणे झाल्याने याचा फायदा भाजपाला होण्याची शक्यता वर्तविली राजकीय वर्तुळात जात आहे़ कारण विक्रमगड विधानसभेच्या निवडणुकीत आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांचा अखेरच्या टप्प्यात विक्रमगडची पेटी फुटल्यानंतरच मोठा लीड घेऊन ते विजयी झाले होते़ मात्र आता परिस्थित बदलेली असून मतदानाची टक्केवारी देखील कमी झाली आहे़ आणि यामुळे सर्वच पक्ष आपला उमेदवार विजयी होण्याचा दावा करीत आहेत़
दरम्यान गेल्या दोन महिन्यापासून मतदार संघामध्ये उमेदवार आपला प्रचार करीत मेहनत घेतांना दिसत होते़ नेमका कौल कोणत्या उमेदवराच्या बाजुने लागणार याची धास्ती उमेदवारांना सतावत आहे. मात्र पुन्हा थंड झालेले राजकीय वातावरण हळूहळू तापतांना दिसत आहे़
मतदारसंघ पुनर्रचनेनंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या अनुसुचित जमातीकरीता राखीव असलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपा (राजेंद्र गावित), शिवसेना (श्रीनिवास वनगा), कॉगे्रस-राष्टÑ्वादी आघाडीचे (दामोदर शिंगडा) बहुजन विकास आघाडी, (बळीराम जाधव) माकप, (किरण गहला) व इतर १ असे ७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असल्याने चुरशीची अशी पंचरंगी लढत झाली़ मात्र खरी लढत ही भाजपा बहुजनविकास आघाडी व शिवसेना यांच्यामध्येच झाली़
पालघर लोकसभेच्या सहा विधानसभा क्षेत्रातील २०९७ केद्रांत मतदान घेण्यात आले. या सप्तरंगी लढतीचा कौल सहा विधानसभा मतदारसंघातील १७ लाख २४ हजार ६ मतदारापैकी ८ लाख ८७ हजार ६८७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे़
पालघर लोकसभेतील डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा, वसई या सहा विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रातील मोजणी ३१ मे रोजी पालघर येथे होणार आहे़ परंतु मतमोजणी ही निवडणुका झाल्यानंतर दुस-या लगेच न ठेवता चार दिवसांनी होत असल्याने मतपेटया तोपर्यत पोलिस संरक्षणात स्ट्राँगरुमध्ये ठेंवण्यात आल्या असून तेथे गेल्या २ दिवसांपासून कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे़ ही निवडणूक सगळ्या देशाचे लक्ष वेधणारी ठरली. तिच्या निकालावरून पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत काय घडेल? याची चुणूक दिसणार आहे. त्यामुळेच ती जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी मोठा जोर लावला होता.
सप्तरंगी लढतीचे स्वरुप पुढेपुढे तिरंगी झाले होते. त्यामुळेही चुरस काहीशी घटली होती. अशा स्थितीत बाजीगर कोण ठरणार याकडे केवळ राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. ही लढत एका परीने मुख्यमंत्री विरुद्ध सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील लढत असल्याची चर्चाही प्रचाराच्या काळात संपूर्ण जिल्ह्यामध्ये रंगलेली होती.