तारापूर येथील उद्योगांची विशेष तपासणी मोहीम पूर्ण, दोषी उद्योगांवर लवकरच उगारणार कारवाईचा बडगा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 11:43 PM2019-11-29T23:43:32+5:302019-11-29T23:44:03+5:30
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाद्वारे तारापूर औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांची आॅक्टोबर महिन्यापासून सुरू केलेली विशेष तपासणी मोहीम (सर्व्हे) आता पूर्ण झाली असून प्रयोग शाळेतून रिझल्ट येणेही सुरू झाले आहे.
- पंकज राऊत
बोईसर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाद्वारे तारापूर औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांची आॅक्टोबर महिन्यापासून सुरू केलेली विशेष तपासणी मोहीम (सर्व्हे) आता पूर्ण झाली असून प्रयोग शाळेतून रिझल्ट येणेही सुरू झाले आहे. त्यामुळे लवकरच दोषी उद्योगांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याने कारवाईच्या भीतीचे औद्योगिक क्षेत्रात सध्या भीतीचे वातावरण आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रामधील उद्योगामधून आणि सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केन्द्रातून (सीईटीपी) मोठ्या प्रमाणात सोडण्यात येणारे रासायनिक सांडपाणी हे पुरेशी प्रक्रिया न करताच नवापूरच्या समुद्रात सोडले जाते. याचा किनारपट्टी भागातील पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ लागल्याने अखिल भारतीय मांगेला परिषदेने राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केल्यानंतर लवादाने विशेष तपासणी मोहीमेसंदर्भात दिलेल्या आदेशानुसार तीन टप्प्यांमध्ये सुमारे ५०० उद्योगांचा सर्व्हे करण्यात आला.
या सर्व्हेमध्ये औरंगाबाद, पुणे, मुंबई तसेच ठाणे येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सुमारे ३२ अधिकारी सहभागी झाले होते. कारखान्यातून बाहेर पडणारे रासायनिक सांडपाण्याचे नमुने घेऊन ते पृथ:करणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते तर हवा मॉनिटरिंग टीमने चिमणीचे सॅम्पलिंग केले. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उद्योगांना दिलेले संमतीपत्र (कन्सेंट)प्रमाणे उत्पादन सुरू आहे का? संमती पत्रातील अटी व शर्तीनुसार उत्पादन घेतले जात आहे का? त्याच बरोबर अटी व शर्तींचे पालन होते आहे की नाही याबाबत बारकाईने तपासणी करण्यात आली.
तारापूरच्या प्रदूषणात प्रचंड वाढ झाली असून जल व वायू प्रदूषण तसेच दुर्गंधीयुक्त वायुमुळे परिसरातील लाखो नागरिक प्रचंड त्रस्त असून आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, प्रदूषण करणाऱ्या औद्योगिक वसाहतींमध्ये तारापूर वसाहत देशात प्रथम आहे.
सर्व्हे पारदर्शक झाला का ? : राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार सदर सर्व्हे झाला असला तरी सर्व्हे सुरू करण्यात येणार आहे इथपासून तो सुरू झाल्याची बातमी तारापूर क्षेत्रात वाºयासारखी पसरली होती. त्यामुळे सर्व्हे दरम्यान काही उद्योग देखभाल व दुरुस्तीच्या नावाखाली तात्पुरते बंद ठेवण्यात आल्याची चर्चा सुरू होती. तर तपासणीत काही दोष व त्रुटीसमोर येऊ नयेत म्हणून एरवी पर्यावरणाचे नियम पायदळी तुडवणाऱ्यांनी खबरदारी घेतली होती. त्यामुळे या सर्व्हेबाबत संशयाचे वातावरण असून पारदर्शक सर्व्हेे झाला का असे येथील सर्व सामन्यांना विचारले असता ‘नाही’ असे उत्तर मिळत आहे. त्यामुळे आता ज्या ५०० उद्योगांचा सर्व्हे झाला आहे त्यापैकी ५० उद्योगांचा कुठलाही गाजावाजा न करता अचानक (सरप्राईज) उच्च पातळीवरून पुन्हा सर्व्हे केला तर सदर सर्व्हे पारदर्शक झाला की नाही ते समोर येण्याची शक्यता असून संशयाचे वातावरणही खºया अर्थाने दूर होईल.