वसई तालुक्यात भात लावणीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 11:10 PM2019-07-22T23:10:30+5:302019-07-22T23:10:38+5:30
मजुरांची टंचाई : शेतीसाठी मजूर शोधून आणण्याची आली वेळ
पारोळ : वसई तालुक्यात भात लावणीच्या कामांनी वेग घेतला आहे. सध्या भात लावणी जोरात असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही मजुरांची टंचाई भासत असल्याने काही शेतकरी घरच्या घरी भात लावणी करत आहेत. तर काही शेतकरी मजुरांच्या शोधात आहेत. मजुरांचे दरही जास्त असल्याने काही शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.
तालुक्यात शेतकऱ्यांनी निरनिराळ्या प्रकारचे भात बियाणे खरेदी केले असून चांगल्या प्रकारे रोपे तयार झाल्याने भात लावणीस सुरुवात झाली आहे. वसई तालुक्यात भाताचे पीक सर्वात जास्त घेतले जाते. नांगरणी करून भात लावणी सुरू आहे. यंदा भाताचे बियाणे, खते तसेच मजुरांचे दर वाढल्याने शेतीचा खर्चही आवाक्याबाहेर गेल्याचे शेतकरी सांगतात. शेतीचा खर्च भरून येत नसल्याने काही शेतकºयांकडून दोन वेळच्या जेवणासह सर्व व्यवस्था केली जाते. त्यामुळे भातलागवड वेळेत होते. मजुरांची टंचाई दूर होते. सध्या शेतकरी आपल्या कुटुंबासह भातलागवडीत मग्न झाला आहे. अनेक शेतकºयांनी जनावरे विकल्याने अनेकांना नांगरजोडी मिळत नाही. त्यामुळे भात लावणी करण्यास त्यांना वेळ लागतो. परिणामी, अनेक जण नांगरणी करण्यासाठी पॉवर टिलरचा उपयोग करतात.
पूर्वी वसई तालुक्यात भात लावणीसाठी नाशिक येथील मजूर असायचे. मजुरीचा दर आणि किती दिवस काम या बोलीवर त्यांना भात लावणीसाठी आणले जाई. त्यांची मजुरी महागल्याने, डहाणू तालुक्यातील मजूर आणले जात. मात्र, ते वापी येथे नोकरीला जाऊ लागल्याने वसईत लावणीसाठी मजुरांची टंचाई निर्माण झाली. मजूर मिळेनासे झाले. त्यामुळे मजुरीच्या दरात वाढ झाली असून त्यांना सध्या २५० ते ३०० दिले जातात.