महामार्गावर एक स्पीडगन व्हॅन रोखते वाहनांचा वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 12:07 AM2021-01-31T00:07:31+5:302021-01-31T00:08:02+5:30
Traffic News : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चिंचोटी महामार्ग पोलीस केंद्रांची एकमेव स्पीडगन व्हॅन दररोज धावणाऱ्या हजारो वाहनांचा वेग रोखते. या महामार्गावरून दररोज मुंबई ते गुजरात आणि गुजरात ते मुंबई अशी हजारो वाहने धावतात.
- मंगेश कराळे
नालासोपारा : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चिंचोटी महामार्ग पोलीस केंद्रांची एकमेव स्पीडगन व्हॅन दररोज धावणाऱ्या हजारो वाहनांचा वेग रोखते. या महामार्गावरून दररोज मुंबई ते गुजरात आणि गुजरात ते मुंबई अशी हजारो वाहने धावतात. वसईतील वाहतूक पोलिसांकडे एकही स्पीडगन व्हॅन अद्यापपर्यंत नाही. जानेवारी ते डिसेंबर २०२० या एका वर्षाच्या कालावधीत चिंचोटी महामार्ग पोलिसांनी दहिसर टोलनाका ते शिरसाड फाटा या त्यांच्या हद्दीमध्ये २८ हजार ६४४ वाहनांवर नियम मोडल्याप्रकरणी स्पीडगन व्हॅनने केसेस करून तब्बल १ कोटी २२ लाख २३ हजार ३०० रुपयांचा दंड
वसूल केला असल्याची माहिती चिंचोटी येथील महामार्ग पोलिसांनी दिली आहे.
वरिष्ठांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली महामार्गावरील भरधाव वेगातील वाहनांवर स्पीडगनच्या मदतीने वाहनांचा वेग रोखला जातो. जी वाहने ओव्हरस्पीडने चालवतात त्यांना ऑनलाइन एक हजारांचा दंड ठोठावण्यात येतो. २०२० या एका वर्षाच्या कालावधीत २८ हजार ६४४ वाहनांवर केसेस करून तब्बल १ कोटी २२ लाख २३ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
- विठ्ठल चिंतामण, पोलीस उपनिरीक्षक,
प्रभारी अधिकारी, महामार्ग पोलीस केंद्र चिंचोटी
अशी मोजली जाते वाहनांची वेगमर्यादा
चिंचोटी महामार्ग पोलीस केंद्रांची इन्टरसेप्टर वाहन ईरिटिगा गाडी आहे. ती एखाद्या रोडच्या कडेला उभी केली जाते. या कारच्या पाठीमागे स्पीडगन मशीन आहे. त्या मशीनद्वारे वाहनांची वेगमर्यादा ॲटोमॅटिक कॅच केली जाते. मग त्या मशीनद्वारे वाहनांचा फोटो काढला जातो. या फोटोमध्ये वाहनावरील नंबर प्लेट स्कॅन केला जातो व वाहनावर ऑनलाइन एक हजारांचा दंड आकारण्यात येतो. भरधाव वेगातील वाहनांना महामार्गावर थांबवत नाहीत. सदर वाहनाच्या चालकाच्या मोबाइलवर दंड केल्याचा मेसेस जातो.