एक कोटी ८० लाखाचा खर्च होऊनही उद्यान अपूर्णावस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 10:56 PM2019-07-08T22:56:58+5:302019-07-08T22:57:21+5:30
पर्यटनस्थळाचा दर्जा मिळूनही : चारोटी येथील उद्यान वादग्रस्त
डहाणू : आदर्श सांसद ग्राम योजनेतून चारोटी येथे बांधलेले निसर्ग पर्यटन स्थळ चारोटी उद्यानात गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत आहे. येथे पर्यटनाचा दर्जा मिळूनही केवळ शासकीय अनास्थेपाटी हे उद्यान आजमितीस उपेक्षित राहिले आहे. आमदार अमित घोडा यांनी याबाबत तक्रार केल्यामुळे चारोटी उद्यान वादात सापडले आहे.
वन विभागाने कासा वनपरिक्षेत्र अंतर्गत चारोटी येथे आदर्श सांसद ग्राम योजना निसर्ग पर्यटन स्थळ विकसित करुन त्याला पर्यÞटन स्थाळाचा दर्जा दिला आहे. वनविभाग डहाणू अंतर्गत मुंबई अहमदाबाद महामार्गानजीक वन परिक्षेत्र कासा अंतर्गत सन २०१७-१८ या वर्षात १ कोटी ८० लाखाचा निधी खर्च होऊनही प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती वेगळीच असल्याने उद्यानावर खर्च केलेला निधी गेला कुठे असा सवाल स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.वन विभागाने चारोटी येथे सन २०१६ ला उद्यान विकसित करण्याचे काम हाती घेतले.
मुंबई अहमदाबाद महामार्गावर डहाणू मधील चारोटी येथे गुलजारी नदीच्या किना-यावर पूर्वीपासून असलेल्या बागेत वन विभागाने चारोटी उद्यान बांधले आहे. या साठी १ कोटी ८० लाख रुपयाचा निधी मंजूर झाला. या भागात असलेल्या पूर्वीच्या बागेचे सुशोभिकरण करण्यात आले आहे.तीन वर्ष उलटूनही आदर्श सांसद ग्राम योजनेअंतर्गत साकारलेले हे निसर्ग पर्यटन स्थळ अपूर्णावस्थेत आहे. राजकीय, शासकीय अनास्थेपोटी या गावाला अद्याप पर्यटनाच्या दृष्टीने चालना मिळालेली नाही. प्राणी, वनस्पती, पक्षी अभ्यासक यांच्याबरोबरच निसर्गप्रेमींसाठी सोयीसुविधा उपलब्ध करणे, हे गाव पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करून स्थानिक ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध करणे, येथील पारंपरिक लोककला संस्कृतीचा विकास करणे इत्यादी गोष्टींचा विचार होणे गरजेचे आहे.
१ कोटी ८० लाखाचा खर्च होऊनही दोन वर्षानंतरही उद्यान अपूर्णावस्थेत असल्याने पर्यटकांना उद्यानाची उपेक्षाच पदरात पडली आहे. त्यामुळे हे निसर्ग पर्यटन स्थळ जनतेला केव्हा उपलब्ध होणार हा प्रश्न लोकांना पडला आहे. या उद्यानाच्या चोहोबाजूला दगडी कुंपण बांधण्यात आले. तर पुर्वीच्याच खोल्यांना रंगरंगोटी करु न त्याला नवीन पणा आणण्याचा प्रयत्न केला आहे.
चारोटी उदयानावरील खर्च झालेली रक्कम आणि मंजूर रक्कम यामध्ये तफावत दिसत आहे. याबाबत वन संरक्षक यांच्याकडे तक्र ार केली आहे.चौकशीनंतर तथ्य समोर येईल
-अमित घोडा
आमदार
वन विभागाच्या चारोटी उद्यानात आम्हाला पावसाळ्यात रोप लावायची आहेत.उद्यान सुशोभित करुन हे लवकरच लोकांसाठी खुले करण्यात येईल .
-भिसे,
उपवन संरक्षक डहाणू