खड्ड्यांमुळे रमाबाईच्या खुनाचा उलगडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 05:38 AM2017-09-14T05:38:27+5:302017-09-14T05:38:41+5:30
रस्त्यांवरील खड्डयांमुळे अ़नेकांचे प्राण गेल्याच्या घटना घडत असतात. वसईत मात्र खड्डयांमुळे चक्क हत्येचा उलगडा झाल्याची घटना घडली आहे. मृतदेह घेऊन जातांना करंजोण येथील खड्ड्यात अपघात झाल्याने रमाबाईच्या हत्येचा उलगडा होऊन तिचा पती आपल्या साथीदारांसह गजाआड झाला.
विरार : रस्त्यांवरील खड्डयांमुळे अ़नेकांचे प्राण गेल्याच्या घटना घडत असतात. वसईत मात्र खड्डयांमुळे चक्क हत्येचा उलगडा झाल्याची घटना घडली आहे. मृतदेह घेऊन जातांना करंजोण येथील खड्ड्यात अपघात झाल्याने रमाबाईच्या हत्येचा उलगडा होऊन तिचा पती आपल्या साथीदारांसह गजाआड झाला.
नामदेव रमाबाईपासून विभक्त झाला होता. त्याने दुसरे लग्नही केले होते. तो रेल्वे कामाला असल्याने रमाबाईने त्याच्याकडे पोटगी आणि मालमत्तेत हिस्सा मागण्यास सुरुवात केली होती. म्हणूनच पोटगी आणि मालमत्तेत हिस्सा मागणाºया रमाबाईचा काटा काढण्यासाठी पती नामदेव पाटील याने अडीच लाखाची सुपारी चंद्रकांत पडवळेला दिली होती. यातील आरोपी वंदना पवारने ९ सप्टेंबरला रमाबाईला काम देण्याच्या बहाण्याने करंजोण येथील एका फार्म हाऊसवर बोलावून घेतले होते. तिला रात्री थांबवून नॉनव्हेजचे जेवणही दिले होते. त्यानंतर वंदना पवारसह चंद्रकांत पडवळे, पांडुरंग कदम लक्ष्मण कोबाड, लक्ष्मण पवार, राकेश पवार यांनी नायलॉनच्या रस्सीने गळा आवळून रमाबाईचा खून केला होता.
एका मोटारसायकलवरून दोघे मृतदेह जंगलात टाकण्यासाठी नेत असतांना बादणपाडा येथील खड्ड्यात बाईकवरून ते पडले. कुत्री भुंकल्याने घाबरून मारेकरी मृतदेह तिथेच टाकून पळून गेले. कुत्र्यांच्या भुंकण्याने काही गावकरी जागे झाले होते. त्यांनी मृतदेह पाहून विरार पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या चार तासात रमाबाईच्या मारेकºयांना गजाआड केले.