दादडे येथे क्रीडा महोत्सव उत्साहात; दहावी, बारावी, उच्चशिक्षित विद्यार्थ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 11:15 PM2020-01-17T23:15:46+5:302020-01-17T23:15:51+5:30
सांस्कृतिक कार्यक्रमात सुद्धा अनेक कलाकारांनी भाग घेतला. या कार्यक्रमाअंतर्गत १० वी, १२ वी, उच्च शिक्षण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
विक्रमगड : ग्रापंचायत दादडे व श्रीराम क्रीडा मंडळ दादडे आयोजित दोन दिवसीय भव्य क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला. या महोत्सवाचे उद्घाटन गणेश कासट (जिल्हा परिषद सदस्य), लाडक्या लहांगे (पंचायत समिती सदस्य), पांडुरंग गोवारी (सरपंच-दादडे), ग्रामपंचायत दादडे सर्व सदस्य, गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक, श्रीराम क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य यांच्या हस्ते झाले.
या महोत्सवात ५५ किलो वजनी कबड्डी स्पर्धा, ३५ किलो वजनी कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. तसेच या वेळी रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सदर दादडे गावअंतर्गत महोत्सवात ५५ किलो कबड्डी स्पर्धेत दादडे कडूपाडा संघाने बाजी मारली तर दुसऱ्या क्रमांकावर दादडे गोंडपाडा हा संघ राहिला. ३५ किलो वजनी कबड्डी स्पर्धेत दादडे - भोयेपाडा संघ विजयी झाला, तर उपविजेतेपद आरतीपाडा संघाने पटकावले.
सांस्कृतिक कार्यक्रमात सुद्धा अनेक कलाकारांनी भाग घेतला. या कार्यक्रमाअंतर्गत १० वी, १२ वी, उच्च शिक्षण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. १० वीतील विद्यार्थी रोशन चिंतामण सापटा याला कै. सुरेश कासट आदर्श विद्यार्थी पुरस्कार देण्यात आला, तर १२ वीतील विद्यार्थी अजय रमेश वाघात याला कै.विजय भेसरा आदर्श विद्यार्थी पुरस्कार देण्यात आला.