पेट्रोलच्या रांगेत घुसली एसटी; पाच वर्षांचा मुलगा गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 06:09 AM2024-01-03T06:09:54+5:302024-01-03T06:10:35+5:30
लांबलचक रांगेत भरधाव एसटी घुसल्याने झालेल्या अपघातात पाच वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी बडाेदा येथे दाखल करण्यात आले आहे.
पालघर : पालघर जिल्ह्यात पेट्रोल भरण्यासाठी पंपांवर ठिकठिकाणी रांगा लागल्या होत्या. तेथील एका लांबलचक रांगेत भरधाव एसटी घुसल्याने झालेल्या अपघातात पाच वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी बडाेदा येथे दाखल करण्यात आले आहे.
ट्रक, टेम्पो, रिक्षा आणि पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहनांच्या रांगा प्रचंड वाढत असतानाच पालघरवरून बोईसरकडे जाणाऱ्या एका भरधाव एसटीने गर्दीत उभ्या असलेल्या एका टेम्पोला जोरदार धडक दिली आणि ती बस गर्दीत घुसली. त्यामुळे टेम्पोजवळ असलेला पुरब उमेश राजभर (वय ५) हा गंभीर जखमी झाला. या दुर्घटनेमुळे त्या भागात काही काळ तणावाचे वातावरण होते.
- एसटीचालकाविरोधात पालघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंधनाचे टँकर पोहाेचत नसल्याने आधीच पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे.
- त्यामुळे धास्तावलेल्या वाहनचालकांच्या पालघर-बोईसर या मुख्य रस्त्यावर सकाळी सात वाजल्यापासून लांबलचक रांगा लागल्या होत्या.
- या रांगांमुळे दोन्ही बाजूने वाहनांची गर्दी वाढली. तणाव वाढला. त्यामुळे वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी आसिफ बेग यांनी टीमसह तेथे बंदोबस्त ठेवला होता.
गंभीर जखमी झालेल्या पाच वर्षांच्या मुलाला आधी पालघरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर पुढील उपचारासाठी बडाेदा येथे नेण्यात आले.