नालासोपारा, वसई शहरातून एसटी बंद
By admin | Published: March 18, 2017 03:00 AM2017-03-18T03:00:01+5:302017-03-18T03:00:01+5:30
१ एप्रिलपासून एसटी महामंडळाने नालासोपारा आणि वसई आगारातील शहरी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला असून परिवहन मंत्र्यांनीही त्याबाबत तातडीने कार्यवाही
- शशी करपे, वसई
१ एप्रिलपासून एसटी महामंडळाने नालासोपारा आणि वसई आगारातील शहरी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला असून परिवहन मंत्र्यांनीही त्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, जागेसाठी आग्रही असलेल्या वसई विरार महापालिकेला एसटीकडून अद्याप प्रतिसाद न मिळाल्याने जागेसाठी अडून बसलेली महापालिका परिवहनच्या बसेस सोडणार की, नाही याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्य सरकारच्या धोरणानुसार एसटी महामंडळाने महापालिका हद्दीमधील शहरी बस वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्नाळा आगारातील शहरी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तर नालासोपारा आणि वसई आगारातील उरलेल्या २५ मार्गांवरील शहरी बस वाहतूक बंद करण्याचा निर्णय सप्टेंबर महिन्यात घेण्यात आला होता. मात्र, वसईकरांनी केलेले आंदोलन आणि वसई विरार महापालिकेने मुदत मागवून घेतल्यानंतर एसटीने ३१ मार्चपर्यंत एसटी सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, महापालिकेने एसटीने भाडे तत्वावर जागा द्यावी अशी मागणी केली आहे.
परिवहनकडे स्वत:ची जागा नाही. स्टँड नाही. त्यामुळे प्रवाशांना सुविधा देणे अवघड होत आहे. एसटीने जागा भाड्याने दिल्यास परिवहनला बस सुरु करणे सोपे होईल, असे महापालिकेचे म्हणणे आहे. जागा मिळत नाही तोपर्यंत महापालिका बस सेवा सुरु करणार नाही, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, शनिवारी दुपारी मुंबई सेंट्रल येथील कार्यालयात महापालिका आणि एसटी अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. याबैठकीत महापालिका जागेचा आग्रह धरणार आहे. या बैठकीत एसटीने जागा देण्याबद्दल सकारात्मक भूमिका घेतली नाही तर मात्र, महापालिका बस सुरु करणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे हजारो प्रवाशांना जानेवारी महिन्यात एसटीने अचानक बस बंद केल्यानंतर चार दिवस जो त्रास सहन करावा लागला तसाच त्रास पुन्हा सहन करावा लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, एसटी बचाव आंदोलन समिती एसटीनेच बस सेवा कायम सुरु ठेवावी अशी पुन्हा मागणी केली आहे. महापालिका स्वत: बस चालवणार असेल तर हरकत नाही. पण, ठेका पद्धतीवर कंत्राटदार बस चालवणार असेल तर ग्रामीण भागातून त्याला विरोध केला जाईल, असा इशारा दिला आहे.
परिवहनमंत्र्यांकडूनही स्पष्ट आदेश नाहीत
गुरवारी परिवहन मंत्री दिवावकर रावते पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी महापालिकेचे परिवहन सभापती भरत गुप्ता यांनी महापालिक ा अधिकाऱ्यांसह त्यांची विरार येथे भेट घेऊन जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावेळी एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून मार्ग काढा असा सल्ला रावते यांनी दिला. रावते यांनी एसटीची शहरी वाहतूक वसई विरार महापालिकेला हस्तांतरीत करण्याबाबत तातडीने बैठक घेऊन कार्यवाही करण्याचे निर्देश एसटी अधिकाऱ्यांनी यावेळी दिले. मात्र, महापालिकेच्या मागणी संदर्भात निर्णय दिला नाही. उलट एसटीच्या जागा महापालिकेला कशा देणार असा प्रतिसवाल रावते यांनी या बैठकीत उपस्थित केला होता.
२४ मार्च रोजी सुनावणी
वसईत एस.टी.सेवा सुरु ठेवण्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनआंदोलन समिती तर्फेडॉमनिका डाबरे यांच्या वतीने शुक्र वारी जनिहत याचिका दाखल करण्यात आली आहे. या संदर्भात २४ मार्च रोजी पाहिली सुनावणी होणार असुन अँड रवी लोखंडे समितीच्या वतीने बाजू मांडणार आहेत.
जागेची अडचण असल्याने परिवहन सेवेला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. एसटीने भाडेतत्वावर जागा उपलब्ध करून नाही दिली तर बस सेवा सुरु करता येणार नाही.
- भरत गुप्ता,
सभापती, परिवहन समिती