भाईंदरमधील स्टेडियम व रस्ते आरक्षणाच्या जागा मीठ विभागाकडून पालिकेला हस्तांतरित होणार - पियुष गोयल
By धीरज परब | Published: December 9, 2023 05:12 PM2023-12-09T17:12:20+5:302023-12-09T17:12:45+5:30
मीठ विभागाची जागा पालिकेस हस्तांतरण करण्या बद्दल सकारात्मक भूमिका दाखवून सदर विकास कामे मार्गी लागतील असे आश्वासन दिल्याचे आ. जैन यांनी सांगितले.
मीरारोड - मीरा भाईंदर शहराच्या विकास आराखड्यातील स्टेडियम, रस्ते आदी आरक्षणांच्या मीठ विभागाच्या मालकीच्या जागा ह्या महापालिकेस हस्तांतरण करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी दिल्याची माहिती आमदार गीता जैन यांनी दिली आहे. मंत्री पियुष गोयल हे मीरा भाईंदर शहरात शनिवार ९ डिसेम्बर रोजी आले होते. उत्तनच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मध्ये आमदार गीता जैन यांनी मंत्री गोयल यांची भेट घेतली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी मनीषा जायभये, महापालिका आयुक्त संजय काटकर, शहर अभियंता दीपक खांबित आदी उपस्थित होते.
आ. जैन यांनी भाईंदर पश्चिम येथील सुभाषचंद्र बोस मैदान येथे स्टेडियमचे आरक्षण क्र.९१ असून सदर जागा मीठ विभागाच्या मालकीची असल्याने स्टेडियम विकसित होण्यात अडचण येत असल्याचे गोयल यांच्या निदर्शनास आणून दिले. भाईंदर पश्चिम ते मीरारोड रेल्वे स्थानक पश्चिम जोडणारा विकास आराखड्यातील महत्वाचा रस्ता असून यामुळे भाईंदर पश्चिम भागातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या शिवाय सुभाषचंद्र बोस मैदान ते मोर्वा या रस्त्यामधील २७ हजार १८० चौ.मी जागा; भाईंदर पश्चिम रेल्वे स्थानक जवळची मंजूर विकास आराखड्यातील रस्ता आदी आरक्षणातील ५९३५.३९ चौ.मी. ची जागा देखील मीठ विभागाच्या मालकीची असल्याने महापालिकेस विकसित करण्यात अडथळा येऊन नागरिकांना सोयी सुविधा देता येत नसल्याचे आ. जैन यांनी मंत्री गोयल यांना सांगितले.
सदर स्टेडियम, रस्ते आदी आरक्षणातील जागा ह्या मीठ विभाग कडून महापालिकेस हस्तांतरित करण्या बाबतची विनंती आ . जैन यांनी लेखी पत्रा द्वारे गोयल यांना केली. यावेळी गोयल यांनी सदर विकास कामां बद्दल चर्चा केली. मीठ विभागाची जागा पालिकेस हस्तांतरण करण्या बद्दल सकारात्मक भूमिका दाखवून सदर विकास कामे मार्गी लागतील असे आश्वासन दिल्याचे आ. जैन यांनी सांगितले. नगरपालिका काळा पासून हे रस्ते व आरक्षणे मीठ विभागाच्या मालकी व कायदेशीर अडचणी मुळे अजूनही रखडलेले आहेत. त्यामुळे मंत्री गोयल यांच्या आश्वासना नंतर हि आरक्षणे विकसित होण्याचा मार्ग मोकळा होईल अशी खात्री असल्याचे आ. गीता जैन यांनी म्हटले आहे.