राजकीय खलबतांना सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 02:37 AM2018-04-28T02:37:33+5:302018-04-28T02:37:33+5:30
लकमंत्री विष्णू सवरा यांना खासदारकीचे तिकीट देऊन त्यांना राज्यातून थेट केंद्रात पाठविण्या बाबत ही चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे.
पालघर : पालघर लोकसभेच्या पोट निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस, शिवसेना, बहुजन विकास आघाडी आदी प्रमुख पक्षांनी आपले उमेदवारांच्या नावांची घोषणा अजूनही केली नसून उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्व पक्षांच्या भूमिका स्पष्ट होणार असल्याचे चित्र आहे.
पालघर लोकसभेची पोटनिवडणूक मुख्य निवडणूक आयोगाने २८ मे रोजी घोषित केल्याने सर्वच राजकीय पक्षांची धावपळ सुरू झाली आहे. काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, माकप या पक्षांनी आपल्या भूमिका अजूनही स्पष्ट केलेल्या नाहीत.
खासदार चिंतामण वनगा यांच्या अकाली निधना नंतर पोटनिवडणूक जाहीर होण्या आधीच त्यांचा मुलगा श्रीनिवास याला लोकसभेचे तिकीट देण्या बाबत मतप्रवाह पुढे आला होता. मात्र, त्याला तिकीट मिळू नये यासाठी वणगांची शोकसभाच होऊ नये याचा प्रयत्न स्वकिया कडून करण्यात आला. आणि ज्या व्यक्तीने आयुष्यभर निष्कलंक राहून पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले त्यांच्या सारख्या निस्वार्थी माणसा सोबत भाजपचे प्रदेश सदस्य बाबजी काठोळे यांच्या विरोधात मुख्यमंत्र्या कडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे भाजपमध्ये गट तटाचे राजकारणाने उचल खाल्ली होती.
दुसऱ्या बाजूने आदिवासी विकास मंत्री आणि पालकमंत्री विष्णू सवरा यांना खासदारकीचे तिकीट देऊन त्यांना राज्यातून थेट केंद्रात पाठविण्या बाबत ही चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र, आपले कॅबिनेट मंत्रिपद संपुष्टात येईल या धास्तीने ते आपला मुलगा डॉ. हेमंत सवरा यांना खासदारकीची तिकीट मिळावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे कळते. परंतु सवरांच्या कामकाजा विरोधात मतदारा मध्ये नाराजी असून वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजपची उमेदवार असलेल्या सवरांच्या मुलीला मतदारांनी नाकारल्याने तिला पराभव पत्करावा लागला होता.
तसेच आदिवासी विकास विभागाचा निधी ५० टक्केहून कमी खर्च करणे, जिल्ह्यातील आदिवासी विभागाच्या कामाकडे करण्यात आलेले दुर्लक्ष, ठक्कर बाप्पा अंतर्गत विकास कामाबाबत झालेला गैरव्यवहार, तरु णांचा रोजगाराचा वाढता प्रश्न, वाढते कुपोषण, ढासळलेली आरोग्य सेवा, प्रशासनावरील सैल झालेली पकड आदी अनेक कारणांमुळे भाजप आणि सवरा विरोधात मतदारामध्ये प्रचंड नाराजी आहे.
श्रीनिवासला राजकीय कामकाजाचा गंध नसल्याने वणगांचा मुलगा म्हणून श्रीनिवासला सहानुभूतीचा लाभ मतदारा कडून मिळाल्यास त्याच्या विजयाच्या आशा निर्माण होऊ शकतात. मात्र, तरीही जेमतेम ८-१० महिन्याचा कालावधी त्याला मिळणार असल्याने शिकण्यातच त्याचा वेळ निघून जाणार आहे.
काँग्रेस कडून माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, माजी खासदार दामू शिंगाडा, शंकर नम आदी ५-६ लोकांनी उमेदवारी मागितली असली तरी जिल्ह्यात काँग्रेस पक्षासाठी काम करणारे एकमेव उमेदवार म्हणून गावीतांकडे पाहिले जाते. तर शिवसेना, बहुजन विकास आघाडी, राष्ट्रवादी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आदी पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याने मे च्या पहिल्या आठवड्यात सर्व पक्षांच्या भूमिका स्पष्ट होणार आहेत. एकंदरच आतापासून जिल्ह्यात राजकीय दंडबैठका सुरु झाल्या आहेत.
घराणेशाहीविरोधात रवींद्र खुताडे
पालघर लोकसभा मतदार संघाच्या जाहीर झालेल्या पोटनिवडणुकी साठी भाजपा कडून आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या मुलाचे नाव पुढे रेटले जात आहे. आपले मंत्रिपद वाचविण्याची खेळी बरोबरच खासदारकी वर हक्क प्रस्थापित करण्याचा दुहेरी डाव हाणून पाडण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी दंड थोपटले आहेत. अपयशी ठरलेल्या सवरानी घराणेशाही लादल्यास त्यांच्या विरोधात विक्र मगड नगर पंचायतीचे नगराध्यक्ष रवींद्र खुताडे उभे करण्याचे सांबरेंनी जाहीर केल्याने भाजप ला त्याचा मोठा फटका बसू शकतो.
जिल्ह्यातील पक्ष आणि शक्यता
भाजपा ला बहुजन विकास आघाडी आणि शिवसेनेची साथ मिळू शकते
भाजप आणि शिवसेनेची युती होईल
भाजप, शिवसेना,बहुजन आघाडी स्वतंत्र लढतील
काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची आघाडी होईल
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष स्वतंत्र लढण्याच्या मनिस्थतीत नसल्याने ते काँग्रेस ला पाठिंबा देतील.
मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे ची जाहीर सभा 1 मे रोजी होणार असल्याने त्यावेळी ते आपली भूमिका स्पष्ट करतील.