हायवे वरील अनधिकृत दुभाजक बंद करण्यास आयआरबीचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 11:28 PM2019-06-16T23:28:44+5:302019-06-16T23:30:19+5:30
अपघातांना बसणार आळा; पोलिसांचा पुढाकार
नालासोपारा : लोकमतच्या ६ जूनच्या अंकात वाढते गुन्हे रोखण्यासाठी वालीव पोलिसांनी अनोखे पाऊल उचलले असल्याच्या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर आयआरबीच्या अधिकार्यांनी तलासरी ते वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील मुंबई अहमदाबाद महामार्गावरील २९ अनिधकृत दुभाजक असल्याची यादी जाहीर केल्यानंतर शनिवारी सकाळपासून हे अनिधकृत दुभाजक बंद करण्यास आयआरबीने सुरुवात केली आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा ब्रिज ते विरार बावखळ पाड्यापर्यंत वालीव पोलीस ठाण्याची हद्द असून यादरम्यान अनधिकृत किती व अधिकृत किती दुभाजक आहे याची माहिती विजय चौगुले यांनी आयआरबीच्या व्यवस्थापनाकडून मागितली होती. त्यानुसार आयआरबीच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी वालीव पोलिसांना २९ दुभाजक अनधिकृत असल्याची माहिती दिली होती.
मुंबई अहमदाबाद महामार्ग क्रमांक ८ वर अनेक हॉटेल, ढाबे, पेट्रोल पंप, रिसॉर्ट मोठ्या प्रमाणात असल्याने येणाºया ग्राहकांच्या सोयीसाठी आणि प्रवेशासाठी मार्ग बनवून त्यांनी नॅशनल हायवे अथोरिटी आॅफ इंडियाने ठेवलेल्या अधिकृत दुभाजकाऐवजी अनिधकृत दुभाजक मोठ्या प्रमाणात निर्माण केले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात महामार्गावर अपघात होत असून त्यांची संख्या वाढली आहे. ती घटविण्यासाठी ते बंद करण्याची कारवाई पोलीस करीत आहेत.
‘तो’ दुभाजक अनिधकृतच
दहीसरच्या कांदरपाडा येथे राहणारे अविनाश विरेंद्रकुमार तिवारी (४१) आणि सीमा विश्वकर्मा (३८) हे दोघे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील किनारा हॉटेलमध्ये जेवण्यासाठी मंगळवारी 28 मेच्या रात्री मोटारसायकल वरून गेले होते. जेवण झाल्यानंतर ते रात्री अडीचच्या सुमारास मुंबईच्या दिशेने घरी जाण्यासाठी निघाले होते. तिवारी यांनी मोटार सायकल रस्ता क्र ॉस करण्यासाठी दुभाजकावर थांबले असताना अचानक समोर आलेल्या एका अनोळखी इसमाने दोघांवर अॅसिड फेकले होते. जिथेही घटना घडली तो दुभाजक अनधिकृतच होता.