रोपेवाटप केंद्र सुरू; चार कोटी वृक्ष लावणार
By admin | Published: June 29, 2017 02:41 AM2017-06-29T02:41:50+5:302017-06-29T02:41:50+5:30
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्यावतीने गत वर्षा प्रमाणे याही वर्षी चार कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून
लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्यावतीने गत वर्षा प्रमाणे याही वर्षी चार कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून त्याकरीता वनविभागाच्या कार्यालयाच्या समोरच स्टॉल लावून कमीतकमी दरात विविध रोपांची विक्र ी करण्यात येते आहे. तिला जनता उत्स्फूर्त प्रतिसाद देते आहे.
या रोपे वाटप केंद्राचे उदघाटन नगराध्यक्ष संदीप वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी जव्हार नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.वैभव विधाते, उप वनसंरक्षक शिवाबाला वनक्षेत्रपाल कमलेश पातकर, वनपाल अंबादास शिरसाठ, वनमित्र पारस सहाणे, वन विभागाचे कर्मचारी, सर्पमित्र गणेश बोराडे, बागुल, अंकुश टोकरे आदि उपस्थित होते.
यावर्षी शासनाच्या सर्व कार्यालयात झाडे लावण्यात येणार असून, लागवडीसाठी लागणारे रोपे वन विभाग पुरवणार आहे. या वर्षी १ ते ७ जुलै २०१७ पर्यंत वन महोत्सव आयोजित केलेला असून यात नागरीकांना झाडे लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे, नागरीकांना स्वस्त दरात रोपे उपलब्ध व्हावी यासाठी वन विभागाने रोपेवाटप केंद्र सुरू केले आहे.
रोपे आपल्या दारी असे बी्रद वाक्य घोषीत करून रोपे लावण्याकरीता सर्वाना आवाहन करण्यात येत असून, शाळेच्या आवारात रोपे लावायची असतील तर कुठलाही रोप फक्त ५० पैशात देण्यात येण्यार असल्याचे वनकर्मचारी संजय चौधरी यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.
तसेच या केंद्रात खैर, काशिद, करंज, चिंच, विलायती चिंच, बोर, आवळा, सीताफळ, शेवगा, मोह, कवठ, बेहडा, हिरडा, पिंपळ, काजू, शिवण, बांबू, गुलमोहर, कांचन, पेरू, आपटा, शिसव, रिठा, वाहवा, टेटू, ऐन, बदाम, पळस, शिसम, बेल आदी रोपे वनविभागाने ५ ते १५ रु पये पर्यंत ना नफा ना तोटा या तत्वावर उपलब्ध केलेली आहेत. त्यांची जनतेकडून खरेदी होत आहे.