राज्य महिला आयोग हे महिलांसाठी दुसरे माहेरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 10:59 PM2019-07-23T22:59:17+5:302019-07-23T22:59:36+5:30
विजया रहाटकर : प्रज्वला योजनेच्या पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण कार्यक्रम
डहाणू/बोर्डी : आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांना तुलनेने कमी त्रास होतो. मात्र, पीडित महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासोबतच न्याय देणारा हा महिला आयोग असून अशा पीडित महिलांसाठी हे दुसरे माहेरघरच आहे. हा आयोग कुटुंबांना जोडण्याचे कार्य करीत असल्याचे उद्गार आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी काढले.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि शासनाच्या प्रज्वला योजनेच्या महिला सक्षमीकरणाअंतर्गत बचत गटांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत त्या बोलत होत्या.
सोमवार, २२ जुलै रोजी सकाळी पारनाका येथील लोहाना सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रास्ताविकात प्रज्वला योजनेच्या अध्यक्षा दिपाली मोकाशी यांनी या योजनेतील तीन टप्पे सांगितले. पहिल्या टप्प्याच्या कार्यशाळेत योजनांबद्दलची कायदेविषयक, सामाजिक तसेच अर्थिक, व्यावसायिक माहिती दिली. दुसऱ्या टप्प्यात बचत गटांना निधी उपलब्ध करून देण्यासह ‘एक जिल्हा, एक क्लस्टर’ करताना या जिल्ह्यात वारली पेंटिंगच्या क्लस्टर उभारणीचे संकेत दिले. तर तिसºया टप्प्यात बचत गट बाजाराविषयी सांगितले.
त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन आणि शासन योजनांची माहिती देऊन सक्षमीकरण करणे हा प्रज्वला योजनेचा उद्देश असल्याचे सांगितले. योजनेच्या प्रभावी अंमलबाजवणीकरिता बचत गटाचे माध्यम निवडून प्रत्येकीपर्यंत पोहोचणे शक्य होत असल्याचेही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी दससूत्री योजनेतील प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, मुद्रा योजना, सुमतीताई सुफेकर योजना, राज्याचे महिला केंद्री उद्योग धोरण आणि उज्ज्वला गॅस योजनेविषयी माहिती देताना उपस्थितांपैकी लाभार्थ्यांची आणि बँक सखींची नोंद घेतली. प्रज्वला योजनेतील दुसºया टप्यातील एक जिल्हा एक क्लस्टर विषयी सांगताना त्यांनी या टप्प्याचा प्रारंभ पालघर जिल्ह्यातून करण्याची घोषणा केली.
यावेळी आमदार पास्कल धनारे, जि.परिषद अध्यक्ष विजय खरपडे, डहाणू पंचायत समिती सभापती रामा ठाकरे, उपसभापती शैलेश करमोडा इ.मान्यवर उपस्थित होते. या प्रशिक्षणाकरिता तालुक्यातील बचत गटाच्या एक हजार महिलांची बैठक व भोजन व्यवस्था करण्यात आली होती.