अद्यापही पारंपरिक झोडपणी सुरू, बळीराजा गाळू लागला घाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 11:59 PM2017-10-28T23:59:25+5:302017-10-28T23:59:36+5:30
ढवळया पवळयांना एकत्र करुन पुन्हा एकदा शेतावरील खळयांत भात झोडपणीने वेग घेतला आहे़ या तालुक्यातील भातकापणीची कामे आटपली आहेत व आता शेतकरी झोडपणीला लागलेला आहे़
राहुल वाडेकर
विक्रमगड : ढवळया पवळयांना एकत्र करुन पुन्हा एकदा शेतावरील खळयांत भात झोडपणीने वेग घेतला आहे़ या तालुक्यातील भातकापणीची कामे आटपली आहेत व आता शेतकरी झोडपणीला लागलेला आहे़ आजच्या आधुनिक युगात विविध यंत्रांचा शेतीक्षेत्रात वापर केला जात असतांनाही विक्रमगड तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र पारंपारिकतेने झोडपणीची-मळणीची कामे केली जात आहेत.
ग्रामीण भागात मुखत्वेकरुन आदिवासी वाडया-वस्त्यांमध्ये रुढी-परंपरा जपली जाते आहे़ मळणीची कामे पारंपारिक पध्दतीनेच जुन्या साहित्यानुसार केली जात आहेत़ तालुक्यातील भातशेती कापणीचा काळ जवळ जवळ आटोपला असून ७ हजार ८५८ हेक्टर क्षेत्रातील गावागावात तयार भात कापून आपल्या शेतामध्ये असलेल्या खळयावर साठविला गेला असून त्याची मळणी सुरु झाली आहे. दिवस मावळतीला जाताच शेतावरील खेळयांमधुन हैक़.़.़ हैक़.़.़. हुर्ऱ.़.़ अशा आरोळ्या परिसरामधून ऐकू येऊ लागल्या आहेत़
या मळणी बाबतची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी विक्रमगड येथील जाणकार जुने शेतकरी तुकाराम त्रिंबक पाटील यांच्याशी संपर्क साधला असता या कामाच्या वेळी खास गावठी कोंबडयांचा झणझणीत रस्सा, नव्या तांदळाची भाकरी अशा असा बेत असतो. त्यामुळे बालकांपासून ते वयोवृध्दांसाठीही एक विशेष मेजवानी असते़ सामूहिक पध्दतीने काढली जाणारी ही मळणी काळाच्या ओघात लोप पावत चालली असली तरी विक्रमगड व परिसरात त्याच परंपरेनुसार केली जात आहे़
कापणी केलेल्या भाताच्या पेंढया झालेल्या असल्या तरी काही प्रमाणात पेढींला भात शिल्लक राहतो़ शेतावर किंवा घराजवळ यासाठी पारंपारिक खळे राखून ठेवलेले असते़ खळयाच्या मध्यभागी लाकडाचा खांब पुरण्यात येतो़ त्याभोवती झोडलेल्या भाताच्या काडयांचा ढीग (उडवी) रचला जातो़ भात कापणी हंगामापर्यंत हे गवत जनावरांना सुका चारा म्हणून खाऊ घातले जाते़ ही मळणी एकमेकांच्या सहकार्याने काढली जाते़