वाड्यामधील दगडखाणी, क्रशर सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 12:55 AM2019-04-08T00:55:01+5:302019-04-08T00:55:04+5:30

तहसीलदारांचे आदेश धाब्यावर : मालकांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी

The stone-slab, crushers continue in the fort | वाड्यामधील दगडखाणी, क्रशर सुरूच

वाड्यामधील दगडखाणी, क्रशर सुरूच

Next

वाडा : तालुक्यातील पश्चिम घाट क्षेत्रात येणा-या भागात गौणखनिज उत्खननास प्रतिबंध करण्यात आल्याने येथील ११ दगडखदाणी व क्रशर मशिन बंद करण्याचे आदेश अलिकडेच वाडा तहसीलदारांनी दिले होते. मात्र या आदेशाला दगडखदाण मालकांनी झिडकारले असून खाणी सुरूच ठेवल्या आहेत. विशेष म्हणजे दुसऱ्या दगडखदाणी मधून रॉयल्टी घेऊन उत्खनन सुरूच ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


वाडा तालुक्यातील काही भाग हा पश्चिमघाट क्षेत्रात येत असल्याची अधिसूचना केंद्र सरकारच्या पर्यावरण व जलवायु परिवर्तन मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेनुसार या क्षेत्रात गौणखिनज उत्खनन करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. वाड्यातील ११ खाणी या कायद्यात मोडत असल्याने त्या बंद करण्याचे आदेश वाडा तहसीलदारांनी अलिकडेच दिले आहेत. असे असतांनाही अनेक खाणी व क्रशर मशिन राजरोसपणे सुरु आहेत. याबाबत अधिक माहिती घेतली असता दुस-या खाणीची रॉयल्टी घेऊन या खदाणी चालवत असल्याचे खाणीतील एका ठेकेदाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून महसूल प्रशासन निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. त्याचा फायदा खदाण मालक घेत असून राजरोसपणे खाणी सुरू ठेवत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अवैधपणे खाणी चालवत असणा-यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावेत अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

खाणी व क्रशर मशिन यांना शासनाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या आदेशांना खाण मालकांनी धाब्यावर बसवले आहे. मनमानी करून त्यांनी खाणी सुरूच ठेवल्या आहेत. डोंगस्ते येथील श्री जी स्टोन क्रशर ही खाण खुलेआम सुरू आहे. खाण खुलेआम सुरू ठेवून तहसीलदारांच्या आदेशाला न जुमानणाऱ्या खाण मालकावर फौजदारी गुन्हा दाखल
करावा.
-रविंद्र मेणे
ग्रामस्थ, डोंगस्ते
तथा अध्यक्ष स्वाभिमान संघटना.

खाणी बंद केल्या असल्याच्या नोटीसा संबंधित मालकांना बजावले आहेत. आम्ही निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने आमच्या कडे वेळ नाही. नियमांचा भंग करणा-यांवर कठोर कारवाई करू.
-फारूख आत्तार, नायब तहसीलदार,वाडा

Web Title: The stone-slab, crushers continue in the fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.