झरी येथे दगडफेक
By admin | Published: June 14, 2016 12:24 AM2016-06-14T00:24:54+5:302016-06-14T00:24:54+5:30
नुकत्याच तलासरी तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तालुकयातील झरी ग्रामपंचायत भाजपाने माकपाच्या ताब्यातून घेतली. अनेक वर्षांपासून माकपाच्या ताब्यात असलेली ग्रामपंचायत
तलासरी : नुकत्याच तलासरी तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तालुकयातील झरी ग्रामपंचायत भाजपाने माकपाच्या ताब्यातून घेतली. अनेक वर्षांपासून माकपाच्या ताब्यात असलेली ग्रामपंचायत हातून गेल्याने माकपाच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप तर ग्रामपंचायत जिंकल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून माकपाला दररोज हिणवण्याचा प्रकार होत असल्याने रविवारी त्याचा विस्फोटच झाला.
भाजपाच्या व माकपाच्या दोन गटांत धुमसत असलेल्या रागाचे पर्यवसान रविवारी संध्याकाळी ७ वाजेदरम्यान झरी वाल्ह्यईपाडा येथे तुफान दगडफेकीत झाले. या दगडफेकीत दोन्ही बाजूंकडील ११ महिलांसह २४ जण गंभीर जखमी झाले. जखमींना प्रथम तलासरी ग्रामीण रुग्णालयात, नंतर अधिक उपचाराकरिता सिल्वासा येथील विनोबा भावे रु ग्णालय तसेच वापी येथील हरिया रु ग्णालयात दाखल करण्यात आले. तासभर चाललेल्या या धुमश्चक्रीत अनेकांची डोकी फुटली .
या प्रकारात २४ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असले तरी दगडफेकीच्या प्रकरणात आपल्यालाही अटक होईल, या भीतीने अनेक जण डोकी फुटूनही रुग्णालयात आले नसल्याने जखमींचा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे.
या दगडफेकीत जखमी झालेले सुरेश वरठा, दसमा वरठा, विजय वरठा, राजेश पाचलकर, लखमी धनारे, सुभाष बारात, राजेश गोधाले, संपत घाटाल, सुनील गोधाले, प्रकाश वरठा, रंधाई वरठा, शंकर गोवारी, श्यामू गोधाले, दिलीप भीमरा, तुळशी गोधाले, विनता भीमरा, धर्मी गोधाले, पिंकी गोधाले, जनकू वळवी, शीला गुरोडा, माली गुरोडा, रामी पाचलकर, शर्मिला गोधाले, सुनील दळवी अशी जखमींची नावे असून याबाबत तलासरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)