‘गाड्यांना डहाणू रेल्वे स्थानकात थांबा द्या’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 12:18 AM2020-10-05T00:18:05+5:302020-10-05T00:18:16+5:30
डहाणू : पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसवरून कोरोना शिथिल काळात सुरू केलेल्या वांद्रे टर्मिनस ते अजमेर आणि वांद्रे टर्मिनस ते ...
डहाणू : पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसवरून कोरोना शिथिल काळात सुरू केलेल्या वांद्रे टर्मिनस ते अजमेर आणि वांद्रे टर्मिनस ते उदयपूर या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना डहाणू रोड रेल्वे स्थानकात थांबा देण्यात यावा, अशी मागणी पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजेंद्र गावित यांच्याकडे रेल्वे प्रवाशांनी केली आहे.
१ आॅक्टोबरपासून नव्याने सुरू केलेली वांद्रे टर्मिनस ते अजमेर ही गाडी बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी संध्याकाळी ४ वाजून १५ मिनिटांनी सुटते, तर वांद्रे टर्मिनस ते उदयपूर रेल्वेगाडी मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी रात्री ११ वाजून २५ मिनिटांनी सुटते. या एक्सप्रेस गाड्यांना बोरीवली, वापी, बलसाड, सुरत असे थांबे दिलेले आहेत. त्यामुळे पालघर, डहाणू, बोईसर, वाणगाव येथील रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वेने कोणतीही सोय केलेली नाही. त्यातच डहाणूपर्यंतची उपनगरीय सेवाही सर्वसामान्यांसाठी बंद आहे. यामुळे पालघर जिल्ह्यातील लोकांना अजमेर, उदयपूर किंवा हरिद्वारसारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाण्यासाठी तसेच कोरोना संसर्ग काळात अडकून पडलेल्या प्रवाशांना या रेल्वे गाड्या मिळण्यासाठी खाजगी वाहनाने बोरिवली किंवा वापी येथे जाणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. यासाठी जिल्ह्यातील जनतेच्या सोयीसाठी या गाड्यांना डहाणू रोड रेल्वे स्थानकात थांबा देण्यात यावा, अशी मागणी प्रवाशांनी खा. राजेंद्र गावित यांच्याकडे केली आहे.