महिला चोरट्यांची वसईत दहशत
By Admin | Published: April 9, 2017 12:54 AM2017-04-09T00:54:53+5:302017-04-09T00:54:53+5:30
दोन-तीन महिला चोर रात्रीच्यावेळी चोऱ्या करीत असल्याच्या भीतीने विरार पूर्वेकडील रानेळे तलाव परिसरात दहशत माजली आहे. आठवडाभरात चार चोऱ्या झाल्याने
विरार : दोन-तीन महिला चोर रात्रीच्यावेळी चोऱ्या करीत असल्याच्या भीतीने विरार पूर्वेकडील रानेळे तलाव परिसरात दहशत माजली आहे. आठवडाभरात चार चोऱ्या झाल्याने आता नागरीक काठ्या, लाठ्या घेऊन पहारा देत असून त्यात महिलाही आघाडीवर आहेत.
विरार रेल्वे स्टेशनपासून जवळच पूर्वेला रानेळे तलाव येथे मोठी वस्ती आहे. याठिकाणी दाटीवाटीेने झोपड्या आणि घरे बांधली गेली आहेत. त्यात वस्तीत गेल्या आठवड्यात चार चोऱ्या झाल्या. त्यामुळे लोक दहशतीखाली आहेत. तीन महिला तोंडावर रुमाल बांधून घरात घुसून लुटमार करीत असल्याची अफवा याठिकाणी पसरली आहे. चोरांना कुणी पाहिलेले नाही. चार चोऱ्या झाल्याने ही अफवा आता दहशत ठरली आहे.
पोलीस दखल घेत नसल्याने स्थानिक लोक रात्री जागून स्वत: पहारा देत आहेत. हातात बॅटरी, लाठी, काठी, लोखंडी सळई घेऊन बायकासुद्धा पहारा देत रात्र जागत आहेत. पोलिसांनी आता याठिकाणी पोलीस मित्रांची गस्त वाढवली आहे. २९ मार्चच्या पहाटे येथून थोड्या अंतरावर असलेल्या कारगिल नगरात एका चोर महिलेला लोकांनी पकडून बांधून ठेऊन मारहाण केली होती. त्या पार्श्वभूमीवर महिला चोरांची टोळी फिरत असल्याची भिती लोकांमध्ये पसरली आहे. (वार्ताहर)