विचित्र घटना! ऐन लग्न घटकेच्या वेळी एक नवरी लिफ्टमध्ये तर दुसरी फ्लॅटमध्ये अडकली, पुढे जे घडले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 12:48 PM2023-05-31T12:48:37+5:302023-05-31T12:48:55+5:30
या दोन्ही घटना वेगवेगळ्या असल्या तरी विचित्र योगायोग असल्याचे बोलले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - भाईंदर पश्चिमेस ऐन लग्न घटिके वेळी एक नवरी लिफ्टमध्ये तर एक नवरी फ्लॅटमध्ये अडकून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. या दोन्ही घटना वेगवेगळ्या असल्या तरी विचित्र योगायोग असल्याचे बोलले जात आहे.
भाईंदर पश्चिमेस विनायक नगर येथील महापालिकेच्या सभागृहात सोमवारी रात्री लग्न होते . लग्नाचा मुहूर्त जवळ आला असतानाच नवरी मुलगी लिफ्ट मध्ये अडकल्याचे समजल्याने एकच धावपळ उडाली. प्रिती वाघेला हि २२ वर्षीय नवरी वैशाली शाह, निकिता वाघेला, विजया शाह सह कियान शाह व प्रथम शिंदे या दोन लहान बालकांना घेऊन लिफ्ट मधून पहिल्या मजल्यावर जात असताना लिफ्ट बंद पडल्याने अडकून पडल्या होत्या.
यावेळी अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले . परंतु वाहतूक कोंडी मुळे अग्निशमन दलास घटनास्थळी येण्यास विलंब झाला. परंतु अग्निशमन दलाचे जवान आल्या नंतर त्यांनी लिफ्टमध्ये अडकलेल्यांची सुमारे २० मिनिटांच्या अथक प्रयत्न नंतर सुटका केली. लिफ्ट खाली आल्यावर ती उघडताच आतून नवरीसह सर्व बाहेर आले. लिफ्टमध्ये अडकल्याने श्वास घेण्यास झालेली अडचण व भीती सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होती. त्यापैकी निकिता यांना जास्त त्रास झाल्याने नजीकच्या डॉक्टरकडे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, नवरी मुलगी सुखरूप बाहेर आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि नंतर ठरल्या मुहूर्तावर शुभमंगल पार पडले.
दुसरी घटना भाईंदरच्या राई गावात घडली . सोमवारी सायंकाळी गावातील अमोल पाटील याचे मुंबईत राहणाऱ्या तेजस्वी सोबत राई मैदानात लग्न होते . नवरी मुलगी शेजारी असणाऱ्या वालचंद प्लाझा इमारतीतल्या एका सदनिकेत थांबली होती . मात्र दाराचे लॉक उघडत नसल्याने नवरी आत अडकून पडली . त्याच इमारतीत राहणारे अग्निशमन दलातील अधिकारी जगदीश पाटील यांनी अग्निशमन दलास पाचारण केले . जवानांनी कटावणीच्या सहाय्याने लॉक तोडून नवरी मुलीला बाहेर काढले . सायंकाळचा ठरलेला मुहूर्त टळून गेल्याने नंतरच्या पुढील शुभ मुहूर्तावर शुभमंगल करण्यात आले