पदवीप्रवेशासाठी बोर्डीत ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 11:21 PM2018-07-26T23:21:43+5:302018-07-26T23:22:32+5:30
विद्यार्थी-पालक हवालदिल; आॅनलाइनमुळे स्थानिक विद्यार्थ्यांचे हाल, विद्यापीठाकडे लक्ष
बोर्डी : येथील एन. बी. मेहता विज्ञान महाविद्यालयातील पदवीच्या पहिल्या वर्षातील प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी गुरु वारी कॅम्पस बाहेर ठिया आंदोलन केले. मात्र विना अनुदानित तुकडीची मागणी प्रलंबित असल्याने असमर्थता दाखवत, या महाविद्यालयीन प्रशासनाने विद्यपीठाच्या कोर्टात चेंडू टोलवला. दरम्यान सत्ताधाऱ्यांनी पाठ फिरवल्याने तसेच ऐन मोक्याच्या क्षणी शिवसेनेने उडी घेत आंदोलनाची धग प्रखर केली.
या महाविद्यालयात यंदाच्या शैक्षणिक वर्षात ५२ आणि गतवर्षी ७८ विद्यार्थी पहिल्या वर्षाच्या प्रवेशापसून वंचित राहिले आहेत. त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरिता, त्यांना सामावून घेण्याच्या मागणी करिता वंचित विद्यार्थी त्यांचे पालक आणि स्थानिकांनी गुरु वारी सकाळी दहा वाजतापासून आचार्य भिसे विद्यानागरीच्या कॅम्पस बाहेर ठिया आंदोलनाला प्रारंभ करून जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर बारा वाजण्याच्या दरम्यान आंदोलन कर्त्यांच्या शिष्टमंडळाला संस्थेचे विभागीय सचिव प्रभाकर राऊत, प्राचार्या आशा वर्तक आणि प्राचार्या अंजली कुलकर्णी या पॅनलने महाविद्यालयीन प्रशासना तर्फे चर्चेकरिता पाचारण केले. कोणत्याही परिस्थितीत हे प्रवेश झालेच पाहिजेत, शिवाय परराज्यातील विद्यार्थी आणि वशिल्याने मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेश बंद करण्याची मागणी शिष्टमंडळाने लावून धरली. मात्र, आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेनुसार अनुदानीत सर्व जागा भरण्यात आल्या असून वंचित विद्यार्थ्यांकरिता १२० जागांची विना अनुदानीत तुकडीची मागणी विद्यापीठाकडे करण्यात आल्याचे प्राचार्या अंजली कुलकर्णी यांनी सांगितले. या वर्षी नॅक प्रक्रि या पूर्ण करूनही विद्यापीठाकडून तुकडी मान्यता रखडण्याचे कारण अस्पष्ट आहे. शिवाय विश्वस्त नितिनभाई मेहेता शिक्षणमंत्र्यांकडे समस्या मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. कॅम्पस बाहेरील आंदोलनकर्त्या विद्यार्थी-पालकांना अन्य आयटी तसेच बायोटेक्नॉंलॉजीच्या रिक्त जागांवर प्रवेश घेण्यासह, त्यांच्या समस्यांचे निरसन करण्याचा प्रयत्न करून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन महाविद्यालयाकडून करण्यात आले.
सोमवारी निर्णय?
अखेरच्या क्षणी स्थानिक शिवसैनिकांनी उडी घेत, पाठिंबा जाहीर केल्याने आंदोलनाला रंग भरला. सोमवार पर्यंत विद्यापीठाचा निर्णय अपेक्षित असल्याने, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे. दरम्यान सत्ताधाºयांनी पाठ फिरवल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती.
प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांकरिता विद्यापीठाकडे विना अनुदानित तुकडी मान्यतेची मागणी केली आहे. ती मिळाल्यास पुढील प्रक्रि या सुरु करता येईल.
-प्राचार्या अंजली कुलकर्णी
(एन. बी. मेहेता,
विज्ञान महाविद्यालय, बोर्डी)