गणेशोत्सवासाठी कडक आचारसंहिता, भंग केल्यास कारवाई, कृत्रिम तलाव बारगळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 03:58 AM2017-08-22T03:58:37+5:302017-08-22T03:58:55+5:30
गणेशोत्सवाचे पावित्र्य जपण्यासोबतच हा सण उत्साहाने आणि शांततेत साजरा व्हावा यासाठी पोलिसांनी ४० मुद्यांची कडक आचारसंहिता लागू केली आहे. तिचे उल्लंघन करणाºया मंडळाच्या पदाधिका-यांवर गुन्हे दाखल होणार आहेत.
- शशी करपे ।
वसई : गणेशोत्सवाचे पावित्र्य जपण्यासोबतच हा सण उत्साहाने आणि शांततेत साजरा व्हावा यासाठी पोलिसांनी ४० मुद्यांची कडक आचारसंहिता लागू केली आहे. तिचे उल्लंघन करणाºया मंडळाच्या पदाधिकाºयांवर गुन्हे दाखल होणार आहेत.
पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे यांनी जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांसाठी ती लागू गेली असून त्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आलेले आहे. सर्व गणेश मंडळांना सहाय्यक धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. ध्वनीक्षेपकाचा आवाज दिलेल्या मर्यादेतच असला पाहिजे. गणेशमूर्तीचे आगमन व विसजर्नाच्या वेळी फटाके वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्रत्येक मंडळाने मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. उत्सवादरम्यान मंडपात संरक्षणासाठी २४ तास स्वयंसेवकांची नेमणूक. महावितरणकडून वीज कनेक्शन घेणे. वादग्रस्त देखावे आक्षेपार्ह देखाव्यांना मनाई. मंडपात मद्यपान व जुगार खेळण्यास मनाई. मिरवणुकीत बैलगाड्यांच्या वापरास बंदी. यासह तब्बल ४० नियम व अटींचे मंडळांना पालन करावे लागणार आहे.
त्यांचे उल्लंघन झाल्यास गुन्हा दाखल करण्याचे निर्देश सिंगे यांनी पोलिसांना दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाºया मंडळाच्या पदाधिकाºयांना किती वर्षांची शिक्षा होऊ शकते यासंबंधीची माहितीही त्यांनी दिली आहे. त्यात ध्वनी प्रदूषणाचे गुन्हे घडल्यास किमान पाच वर्षे शिक्षा व एक लाख रुपये दंड. असाच अपराध दुसºयांदा केल्यास सात वर्षे कैद व दोन लाख रुपये दंडाची तरतूद आहे. जबरदस्तीने वर्गणी घेणाºया मंडळांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असून त्यासाठी तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गणेश आगमन व विसर्जन मिरवणूक मारामारीचे प्रकार घडल्यास सहा ते तीन वर्षांपर्यंतची शिक्षा होईल. धार्मिक भावना दुखाविणारे कृत्य घडल्यास तीन ते पाच वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही सिंगे यांनी केले आहे.
पोलीस करणार यंदा अभिनव प्रयोग...
एकीकडे गणेशोत्सव शांततेत साजरा व्हावा यासाठी कडक आचारसंहिता लादणाºया पोलिसांनी स्वत: पुढाकार घेऊन अभिनव उपक्रम हाती घेतले आहेत. शिस्तबद्ध गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरीय गणेश स्पर्धा आयोजित केली आहे. त्यात प्रत्येक तालुक्यातील तीन उत्कृष्ट गणेश मंडळांचा गौरव करण्यात येणार आहे.
गणेशमूर्तीं विसर्जनामुळे प्रदूषण होते. विसर्जनाच्या दिवशी प्रचंड गर्दी होत असल्याने ताण निर्माण होतो. हे टाळण्यासाठी विसर्जनाच्या दिवशी गणेश मूर्ती जमा करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. भाविकांकडून गणेश मूर्ती सामाजिक कार्यकर्त्यांमार्फत जमा केल्या जाणार आहेत. त्यानंतर त्या मूर्तींचे समुद्रात विधीवत विसर्जन करण्यात येणार आहे.
चांगल्या अवस्थेतील मूर्ती जतन करून पुढील वर्षी वापरल्या जात असतील तर तो ही प्रयोग केला जाणार आहे. अर्थात हा प्रयोग विरार विभागाचे डीवायएसपी जयंत बजबळे यांनी प्रायोगिक तत्वावर आपल्या क्षेत्रापुरता करण्याचा निर्णय घेतला आहे.
कृत्रिम तलाव बारगळले
गेल्या वर्षी मोठा गाजावाजा करीत महापालिकेचे आयुक्त सतीश लोखंडे यांनी कृत्रिम तलावातच विसर्जन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी दोन कोटींची तरतूद तसेच कृत्रिम तलावाचे सर्वेक्षणही करण्यात आले होते. मात्र, आयत्या वेळी घेण्यात आलेला हा निर्णय पुरता फसला होता. त्यावेळी पुढच्या वर्षापासून कृत्रिम तलावातच विसर्जन केले जाईल. चार फूटांपर्यंत मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करून मोठ्या मूर्तींचे विसर्जन समुद्रात करणे बंधनकारक करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, यंदाही हा प्रयोग फसला आहे.